पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत सत्तांतर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षातील महापौर कोण होणार याबाबत उत्सुकता आहे. गुरुवारी दुपारी तीनपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असून, महापौरनिवड बिनविरोध होणार असल्याचे विश्वसनीयरीत्या समजते. महापौरपद चिंचवडला मिळणार असून, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपद भोसरी विधानसभा मतदारसंघास मिळणार आहे.महापालिका निवडणुकीत सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश संपादन केले आहे. १२८ पैकी भाजपाला ७७ जागा मिळाल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेसला ३६, शिवसेनेस ९, अपक्ष ५, तर मनसेला एक जागा मिळाली आहे. भाजपाला एकमुखी बहुमत मिळाले आहे. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि विविध समित्यांचे अध्यक्ष ही पदे भाजपालाच मिळणार आहेत. महापौरपदाची निवडणूक १४ मार्चला होणार आहे. महापौर निवडीनंतर उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विविध समित्यांचे अध्यक्ष निवडले जाणार आहे. त्यामुळे मंगळवारी फक्त महापौर निवड होणार आहे. पक्षीय बलाबल पाहता विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची मते एकत्रित केली, तरी महापौर निवडणुकीत यश मिळविणे कठीण आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून उमेदवारीअर्ज भरण्यात येणार नसल्याचे दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाने गटनेता म्हणून एकनाथ पवार यांची निवड केल्यानंतर पवार यांनी चार अर्ज नेले आहेत. शिवसेनेने राहुल कलाटे, मनसेने सचिन चिखले यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता म्हणून योगेश बहल यांची निवड केली आहे. शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीसह इतर पक्षांनी महापौरपदासाठी आजपर्यंत अर्ज नेलेला नाही. त्यामुळे अपक्षांचा गटनेता म्हणून झामाबाई बारणे यांची निवड केली आहे. त्यामुळे महापौरनिवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)नेत्यांमध्ये समेटभारतीय जनता पक्षास अभूतपूर्व यश मिळाले असले, तरी सध्या शहरात महापौर निवडीवरून राजकारण होऊ शकते. खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे असे प्रमुख गट आहेत. त्यामुळे यासाठी नेत्यांमध्ये समेट घडविण्याचे काम वरिष्ठ नेत्यांनी केले होते. त्यामुळे महापौरनिवडीसाठी मतदानाची गरज भासणार नाही. पहिल्या टप्प्यात पक्षातील ज्येष्ठांचा विचार केला जावा, अशी जुन्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे नामदेव ढाके यांचे नाव निश्चित मानले जाते. तसेच शत्रुघ्न काटे, नितीन काळजे, केशव घोळवे यांच्या नावांचीही चर्चा आहे.
महापौरपद चिंचवडला
By admin | Published: March 09, 2017 4:20 AM