महापौरपदाच्या निवडणुकीतही आता ‘महाशिवआघाडी’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 09:14 PM2019-11-16T21:14:43+5:302019-11-16T21:16:30+5:30
पालिकेत नवी समीकरणे : राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना आणि मनसे देणार एकत्र उमेदवार
पुणे : राज्यातील सत्तासमिकरणे बदलत असतानाच त्याचे परिणाम पुण्यामध्येही पाहायला मिळू लागले आहेत. नुकतीच राज्यातील महापालिकांच्या महापौरपदाची सोडत झाली आहे. पुण्याचे महापौरपद खुल्या गटासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे भाजपमधील इच्छूकांची संख्याही वाढली आहे. भाजपाला आव्हान देण्यासाठी पुण्यातही महाशिवआघाडीचा प्रयोग केला जाणार असून राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन उमेदवार देणार आहेत.
विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजपा-सेना युतीला तडा गेला असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत सेनेने चूल मांडायचा प्रयत्न सुरु केला आहे. येत्या काही दिवसातच महाशिवआघाडीचे सरकार आकार घेईल असे चित्र दिसत आहे. महापालिकेतील गेल्या अडीच वर्षातील भाजपाचा कारभार पाहता विरोधी पक्षांनी कायमच आम्हाला विश्वासात घेतले जात नाही असा सूर लावलेला आहे. भाजपाकडून विरोधी पक्षांनाही गृहीत धरले जात असल्याची टीका विरोधी पक्षनेते दिलीप बराटे केली आहे. सत्ताधाºयांच्या कारभाराला शह देण्यासाठी पालिकेतही नवी समिकरणे आकार घेऊ लागली आहेत. महापौर मुक्ता टिळक यांनी विधानसभा निवडणूक जिंकल्याने त्या आमदार झाल्या आहेत. तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष सुनिल कांबळेही आमदार झाले आहेत. त्यातच आता महापौर पदाची मुदत संपल्याने महापौरपदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेण्यासाठी इच्छूक देव पाण्यात ठेवून आहेत. यासोबतच वरिष्ठांच्या भेटीगाठीही सुरु आहेत. सध्या शहरात खासदार गिरीश बापट, संजय काकडे, शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गटांचे नगरसेवक सक्रिय झाले आहेत. परंतू, यातील एक मोठा गट आपल्याला प्रतिनिधीत्वमिळत नसल्याने नाराज असल्याचे समजते. त्याचा फायदा उचलण्यासाठी विरोधी पक्षांनी तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, मनसे आणि शिवसेना एकत्र येऊन महापौरपदासाठी उमेदवार देणार आहेत. या चारही पक्षांचे ६३ नगरसेवक पालिकेत आहेत. तर भाजपाचे ९९ नगरसेवक आहेत. त्यामुळे चित्र स्पष्ट आहे. तरीदेखील विरोधी पक्षांनी आपला उमेदवार मैदानात उतरवून लढण्याची तयारी दर्शविली आहे. पालिकेतही महाशिवआघाडीचा निर्णय घ्यायचा किंवा नाही याबाबत आपापल्या पक्षाच्या वरिष्ठांसोबत आणि पक्षप्रमुखांसोबत पालिकेतीलगटनेते बोलणार आहेत. त्यांच्याकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर याबाबतचा निर्णय होईल. तुर्तास पालिकेतही महाशिवआघाडीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
====
पालिकेतील विरोधी पक्षाचे संख्याबळ
पक्ष नगरसेवक
कॉंग्रेस १०
शिवसेना १०
मनसे ०२
राष्ट्रवादी कॉंग्रेस ४१