पुणे : शहरात गेल्या तीन आठवड्यांपासून दिवसभरात दोन ते तीन हजार कोरोना रुग्ण आढळत होते. मात्र हा आकडा आता वीस हजारांवर पोहोचला आहे. कोरोनाच्या या वाढत्या संसर्गाच्या दृष्टीकोनातून जास्तीत जास्त लसीकरण व्हायला हवं, यासाठी पुण्यात चोवीस तास लसीकरणाची सुविधा करण्यात आली आहे. याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी 'लोकमत'शी बोलताना माहिती दिली.महापौर मोहोळ यांनी सांगितल्याप्रमाणे, ''सध्या शहरात १०९ ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. आत्तापर्यंत सव्वा तीन लाखांपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. लवकरात लवकर कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. खासगी हॉस्पिटल मधील ५० टक्के बेड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या महापालिकेकडे ५ हजार पाचशे बेड उपलब्ध आहेत. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी शहरात ४ ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू आहेत. शहराच्या प्रत्येक भागात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. पुणे शहरात २४ तास लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. सुतार हॉस्पिटल, कमला नेहरु हॉस्पिटल, राजीव गांधी हॉस्पिटल या केंद्रांवर प्रामुख्यानं २४ तास लसीकरण सुरु राहील.''लायगुडे हॉस्पिटलमध्ये येणारे रुग्ण आणि उपलब्ध लसींचा साठा यात तफावत होती. लस कमी पडत असल्याच्या रुग्णांच्या तक्रारी होत्या. मात्र त्यावर स्पष्टीकरण देताना महापौर म्हणालेत की, ''केंद्र आणि राज्य सरकारशी समन्वय साधून महापालिका लस पुरवठा वाढवून घेण्यावर भर देत आहे. पुण्यात कोणत्याही हॉस्पिटलची जेवढी मागणी असते त्याप्रमाणे तिथे कोरोना लसीचा साठा पुरवण्यात येत आहे.''ज्या रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत पण ते घरात क्वारंटाईन राहू शकत नाहीत त्यांच्यासाठी 'कोविड केअर सेंटर्स' पुण्यातील येरवडा, खराडी, चंदननगर, कोंढवा या भागात एक हजार बेड्स उपलब्ध झाले आहेत. पुण्याच्या सर्व भागात 'कोविड केअर सेंटर्स' उभे करावेत आणि साधारण पाच हजार बेड्सचं नियोजन असल्याचंही महापौर यांनी यावेळी सांगितलं. शिवाय सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये गेल्यावर्षीप्रमाणे लवकरच 'कोविड केअर सेंटर' सुरु होणार आहे. बालेवाडीला साडेआठशे बेड्सचं 'कोविड केअर सेंटर' सुरु होणार आहे.
पुण्यात कोरोनाची रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी; मुरलीधर मोहोळ यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 3:46 PM