शहरात गेल्या तीन वर्षांतील पावसाची स्थिती लक्षात घेता कमी वेळात अधिक पाऊस असे प्रकार वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात मान्सून पूर्व कामे वेगाने सुरु असून त्यामध्ये सद्यस्थितीला समाधानकारक काम केले आहेत. तसेच उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करा, असे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत', अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. शिवाय गेल्या दोन वर्षांसारखी परिस्थिती उद्धभू देऊ नका, असे स्पष्ट आदेशही महापौर मोहोळ यांनी दिले आहेत.
शहरातील मान्सून पूर्व कामांचा आढावा महापौर मोहोळ यांनी प्रशासनाकडून घेत विविध सूचनाही दिल्या आहेत. या आढावा बैठकीला उपमहापौर सुनिता वाडेकर, 'स्थायी'चे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, काँग्रेसचे गटनेते आबा बागूल, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, मनसे गटनेते साईनाथ बाबर, आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
महापौर मोहोळ म्हणाले, 'पाणी साठणारी धोकादायक ठिकाणे, नाला खोलीकरण, गाळ काढणे, नाला रुंदीकरण, नाल्यातील अतिक्रमणे, कात्रज तलावातील पाणी पातळी नियंत्रणात ठेवणे, ड्रेनेज लाईन आणि चेंबर स्वच्छ करणे आदी कामांचा आढावा झोननिहाय घेतला. शिवाय कोणत्या झोनमध्ये किती टक्के कामे पूर्ण झाली, याचीही सविस्तर माहिती घेतली आहे'
'पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात मागील तीन वर्षात जोरदार पाऊस होत आहे. यामुळे ओढे-नाले यांच्या बाजूला राहणार्या नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणावर पाणी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता सीमाभिंतीची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेशही दिले आहे. जेणेकरून तेथील नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकाराचा त्रास होता कामा नये', असेही महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले.
तसेच ते पुढे म्हणाले की, सद्यस्थिती जाणून घेतली असून आता पुन्हा पंधरा दिवसात ज्या ठिकाणी पाणी साचण्याच्या आणि पाणी गेल्याच्या घटना मागील वर्षी घडल्या आहेत. तिथे प्रत्यक्ष पाहणी करणार असून पाहणीनंतर पुन्हा आढावा बैठक घेणार आहे. अधिकार्यांनी सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे आदेशदेखील देण्यात आले आहेत.
आतापर्यंत झालेली प्रमुख कामे...
- नानासाहेब पेशवे तलाव कात्रज येथील पाण्याची पातळी गेट वॉल च्या साह्याने सांडव्याच्या पातळीपेक्षा तीन मीटरने खाली राखणे
- राजीव गांधी तलाव कात्रज येथे सायफन पद्धतीचा अवलंब करून पाण्याची पातळी तळ्याच्या भिंतीच्या पातळीपेक्षा चार मीटरने कायम खाली राहणे सध्या तलावातील पातळी 4.97 मीटरने खाली आहे.
- आंबील ओढा येथे गाळ काढण्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात आले असून यामुळे नाल्याची खोली दीड मीटरपर्यंत खाली गेली आहे. त्यामुळे नाल्याचा प्रवाह सुरळीत आहे.
- सीमा भिंती बांधण्याचे काम सुरू आहे.