लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीला संभाजी पुलावर उभारण्यात येणारा मेट्रो पूल अडथळा ठरत असल्याने, या पुलाच्या अन्य पर्यायाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत मेट्रो पुलाचे काम थांबविण्याचे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत.
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या भव्य दिव्य रथांना, संभाजी पुलावर उभारण्यात येणारा मेट्रो पूल अडथळा ठरणार आहे़ यामुळे शहरातील गणेश मंडळांनी या पुलास विरोध करीत मंगळवारी रात्री पूल उभारणीचे काम थांबविले होते़ तर आज काही गणेश मंडळांनी व कार्यकर्त्यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या दालनात जाऊन या मेट्रो पुलाच्या कामास विरोध केला.
तर दुसरीकडे सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांनी या मेट्रो पुलाला जोरदार विरोध केला़ या पुलाचे काम थांबविण्यासाठी महापौरांच्या आसनासमोर येऊन या सदस्यांनी ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष सुरू केला़ संभाजी पुलावरून मेट्रो मार्ग निश्चित करताना, शहरातील जगप्रसिद्ध अशा गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाचा विचार का केला गेला नाही, असा प्रश्न उपस्थित करून, दीपक मानकर यांनी या पुलाला पर्यायी व्यवस्था होईपर्यंत काम थांबविण्याची मागणी केली.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या वेळी तुमच्याप्रमाणे मी सुद्धा प्रथम गणेश मंडळाचा कार्यकर्ताच आहे़ त्यामुळे सर्वांच्या भावना लक्षात घेऊन, गणेश विसर्जन मिरवणुकीतील येणाऱ्या मेट्रो पुलाच्या अडथळ्यातून मार्ग काढण्यासाठी लवकरच बैठक बोलावली जाईल व त्यातून सकारात्मक मार्ग काढला जाईल, असे सांगितले़ तसेच ही बैठक होइपर्यंत, संभाजी पुलावरील मेट्रो पुलाचे काम थांबविण्याबाबतच्या सूचना मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.