पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर महापालिकेच्यावतीने टाकलेला बहिष्कार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते स्वतंत्रपणे भूमिपूजन करण्याचा निर्णय मागे घेत महापौर प्रशांत जगताप यांनी बुधवारी घूमजाव केले. काँग्रेसने मात्र स्वतंत्र भूमिपूजन घेण्याची भूमिका कायम ठेवली असून, २३ डिसेंबरला सकाळी ११ वाजता स्वारगेट येथे भूमिपूजन केले जाणार असल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी स्पष्ट केले आहे. मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांच्या शेजारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना स्थान देण्यात आले नाही; तसेच दोन व्यासपीठांची रचना करून पालिकेला डावलले गेल्याचा आरोप करीत प्रशांत जगताप यांनी शुक्रवारी स्वतंत्रपणे कामगार पुतळा येथे भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यामुळे मेट्रोच्या भूमिपूजनावरून राजकीय पक्षांमध्ये वाद पेटल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र बुधवारी वेगाने घडलेल्या घडामोडींनंतर महापौरांनी स्वतंत्र भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द केल्याचे जाहीर केले आहे. महापौरांच्या या निर्णयावर काँग्रेसकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी शरद पवार यांना सन्मानाने बोलाविले आहे. आयुक्त कुणाल कुमार यांनी दिलेल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये त्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे.’’ महापौरांनी अचानक यू टर्न घेत स्वतंत्र भूमिपूजनाच्या कार्यक्रम रद्द करण्याच्या निर्णयावर काँग्रेसकडून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी सांगितले, ‘‘२३ डिसेंबरला काँग्रेसकडून मेट्रोचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.’’ काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले, ‘‘माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मेट्रोच्या स्वारगेट डेपोजवळील स्टेशन येथे स्वतंत्रपणे भूमिपूजन करण्यात येणार आहे.’’ (प्रतिनिधी)
मेट्रोचे स्वतंत्र भूमिपूजनावरून पुण्याच्या महापौरांचे घूमजाव
By admin | Published: December 22, 2016 2:12 AM