पुणे :पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आता पुणेकरांशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. नागरिकांच्या समस्या जाणून घेता याव्यात यासाठी त्यांनी या माध्यमाची निवड केली आहे. दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी संध्याकाळी ७ वाजता मोहोळ त्यांच्या पेजवरून संवाद साधणार आहेत. येत्या शनिवारपासून हा उपक्रम सुरु होणार आहे.
भाजप सरकारने यापूर्वीही नागरिकांशी थेट संवाद साधता यावा याकरिता 'मन की बात', कोपरा सभा' असे उपक्रम राबवले होते. मात्र केंद्र आणि राज्य स्तरावर राबवले जाणारे उपक्रम पहिल्यांदाच मोहोळ यांच्या संकल्पनेतून शहर पातळीवर राबवण्यात येणार आहे. यापूर्वी महापौर आपल्या दारी सारखा उपक्रम राबवण्यात येत होता. मात्र आता वेळ घालवता आणि नियमितपणे पुणेकर त्यांच्या समस्या, संकल्पना आणि सूचना मांडू शकणार आहेत.
याबाबत ते म्हणाले की, 'शहराची भौगोलिक व्याप्ती आणि लोकसंख्या बघता प्रत्येक नागरिकाची समस्या जाणून घेणे शक्य होत नाही. अशावेळी या माध्यमातून नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेणार आहे. यातून नागरिकांच्या सूचना आणि संकल्पनांची योग्य दखल घेऊन अंमलबजावणी करण्याचा मानस आहे'.