पुणे : पुणेकरांना कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ हे पुढाकार घेऊन केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्याशी पत्रव्यवहार करत आहेत. ते लस खरेदीची परवानगी देण्याबाबत विनंती करत आहे़ त्यांच्या या भूमिकेचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्वागतच करीत आहे़ पण, पुणेकरांच्या लशींसाठी महापौरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे धारिष्ट्य दाखवून लसीची मागणी केल्यास पुणेकरांना लागलीच लस मिळेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले़
जगताप म्हणाले, राज्य सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे पुण्यातील रुग्णसंख्या घसरणीला लागली आहे. मात्र, अद्याप संपूर्ण चिंता मिटलेली नाही. त्यामुळे पुणेकरांना दिलासा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण होण्याची गरज आहे. सुदैवाने लसीची निर्मिती पुण्यातीलच सिरम इन्स्टिट्यूटमध्ये होत असून, इन्स्टिट्यूटने केंद्र सरकारने पुणे महापालिकेला परवानगी दिल्यास लसींचा पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे.
केंद्रात आणि पुणे महापालिकेत एकाच पक्षाची सत्ता आहे. पुण्याचे खासदार व शहरातील आठही आमदार भाजपचे आहेत. त्यामुळे, आपण केंद्र सरकारकडे केलेल्या पत्रव्यवहाराचा निश्चितच सकारात्मक परिणाम होईल़ सद्यस्थितीला पुण्यावरील कोरोनाचे संकट दूर करणे, हे आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे, पक्षीय मतभेद विसरून आम्ही लस मिळविण्यासाठी महापौर करीत असलेल्या प्रयत्नांना साथ देण्यास तयार असल्याचेही जगताप म्हणाले़
----------------------