पुणे : महिलांसाठी आरक्षित बसमधील जागेवर बसून महापौर प्रशांत जगताप यांनी वानवडी ते महापालिका असा प्रवास केला. त्यामुळे महिलांना ताटकळत उभे राहावे लागले अशी छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. त्यामुळे महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागेवरून प्रवास केल्याप्रकरणी प्रशासनाने त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी तसेच महापौरांनी ही स्टंटबाजी लगेच थांबवावी, अशी टीका भाजपाचे शहराघ्यक्ष योगेश गोगावले यांनी केली आहे. महापौरांनी केलेला पीएमपीमधून प्रवास व कचरा प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली भूमिका याबाबत गोगावले यांनी टीका केली आहे. जगताप बेजबाबदारपणे वागत असून, सवंग प्रसिद्धीसाठी त्यांचा आटापिटा सुरू आहेत. जागोजागी पडलेला कचरा पाहून लोकप्रतिनिधी म्हणून मला माझ्या शहराची लाज वाटते, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. शहराध्यक्षांच्या या टीकेनंतर तरी महापौरांनी प्रसिद्धीसाठीची स्टंटबाजी थांबवून पुण्याच्या नागरी समस्या सोडविण्यासाठी गंभीरपणे प्रयत्न करावेत असा सल्ला गोगावले यांनी महापौरांना दिला आहे.राष्ट्रवादीने पुणेकरांचा विश्वास गमावल्यानेच कचरा प्रकल्पांना नागरिक खो घालत आहेत अशी बेजबाबदार विधाने करण्याची वेळ महापौरांवर आली आहे. सर्वसामान्य पुणेकरांच्या प्रश्नांची जाण नसल्याचे महापौरांच्या वर्तनातून अधोरेखित होत आहे अशी टीका गोगावले यांनी केली. महापौरांनी पीएमपीचे संचालक म्हणून अनेक वर्षे काम केले आहे, त्या वेळी पीएमपीचा कारभार रसातळाला गेला. आता आचारसंहिता असल्याने कोणताही निर्णय घेता येणे शक्य नसताना पीएमपीतून केवळ स्टंटबाजी म्हणून महापौरांनी प्रवास केला असल्याची टीका गोगावले यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
महापौरांनी स्टंटबाजी थांबवावी
By admin | Published: November 07, 2016 1:42 AM