पुणे : महापौर प्रशांत जगताप येत्या २१ व २२ जुलै रोजी इराणमध्ये होणाऱ्या जागतिक महापौर परिषदेस उपस्थित राहणार आहेत. अशा प्रकारची ही पहिलीच महापौर परिषद असून, इराण सरकारने त्याचे निमंत्रण पाठवले असून राज्य सरकारने या दौऱ्याला अधिकृत मान्यता दिली आहे. महापौरांसमवेत अन्य चार जणांचाही समावश दौऱ्यात असेल, मात्र त्यांची नावे अद्याप निश्चित केली नाहीत. या दौऱ्याचा सगळा खर्च आपण स्वत: करणार आहोत, असे महापौर म्हणाले. इराण सरकारने या परिषदेचे आयोजन केले आहे. त्यांच्या दूतावासातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी आपण बोललो. त्या वेळी त्यांनी परिषदेत पुण्याला बोलण्यासाठी खास प्रतिनिधित्व दिल्याची माहिती महापौरांनी दिली. पुणे शहराच्या प्रगतीचा वाढता वेग, भविष्यात इथे सुरू होणारे मेट्रोसारखे प्रकल्प, नदी सुधार योजना याबाबत जगातील अनेक देशांना उत्सुकता आहे. परिषदेतील चर्चेचा पुण्याला उपयोग होईल, या खात्रीतून निमंत्रणाचा स्वीकार केला, असे महापौर म्हणाले.
महापौर निघाले इराणला!
By admin | Published: July 16, 2016 1:18 AM