धनकवडी : नवीन वर्षाबरोबरच (१ जानेवारी) सातारा रस्ता बीआरटी मार्ग सुरू होणार अशी महापौरांची घोषणा पोकळ ठरल्याचा प्रत्यय पहिल्याच दिवशी आला. बीआरटी सुरू होणार या प्रतिक्षेत असणाऱ्या हजारो प्रवाशांची निराशा झाली. गेली अनेक वर्षे बीआरटी प्रकल्पाचा घोळ मिटेल अशी खात्री मनी बाळगून असलेल्या सातारा रस्ता परिसरातील प्रवाशांना पुन्हा एकदा फसविले गेल्याची भावना आणि संताप व्यक्त होत आहे.
प्रकल्प, दुरुस्ती व नंतर पुर्नविकास या चक्रव्यूहात अडकलेला सातारा रस्ता सुरळीत व्हावा आणि मार्गा वरील अडथळे दूर व्हावेत या अपेक्षा नागरिकांच्या अनेक वर्षांपासून आहेत. आजवर या मार्गावर सुमारे सहाशे कोटी रुपयांचा चुराडा होऊन सुद्धा या मार्गाचे काम पूर्णत्वास जात नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रचंड मोठा रोष व्यक्त केला. कात्रज - स्वारगेट हा केवळ सहा कि.मी. बीआरटी प्रकल्प सुरू करण्यासाठी महापालिकेला तब्बल १४ वर्षे शक्य झाले नाही अशी शोकांतिका नागरिकांनी व्यक्त केली. या नियोजन शून्य कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे.
याबाबत 'लोकमत'ने यावर वारंवार आवाज उठवला होता. कोरोनानंतर अनलॉकच्या कालावधीत कामाला सुरुवात झाली मात्र अत्यंत धिम्या गतीने होत असलेल्या कामाबद्दल अनेकदा नाराजी व्यक्त झाली. मात्र ढिम्म प्रशासनाने सोयिस्करपणे दुर्लक्ष केले. आज रोजी बीआरटी मार्गातील दहा बस थांबे पुर्णत्वास पोहोचले आहेत. त्या मार्गातून धावणाऱ्या बस उपलब्ध आहेत. या आधारावर महापौरांनी संबंधित आधिकाऱ्यांबरोबर चार दिवसांपूर्वीच मार्गाची पाहणी केली होती. यावेळेस त्रुटी दूर करून बीआरटी मार्ग सुरू करण्यात येईल असे आश्वासन सुद्धा दिले होते. परंतु आज नवीन वर्षावर सुद्धा परस्थिती जैसे थेच आहे. त्यामुळे बीआरटी मार्ग कधी सुरू होईल हा प्रश्न अनुअनुत्तरितच आहे.
.................
महापौरांनी आश्वासन देऊन सुध्दा १ जानेवारीपासून बीआरटी मार्ग चालू झाला नाही.याला जबाबदार कोण? शेकडो कोटींचा खर्च करून सुध्दा बीआरटी मार्गत अनेक त्रुटी आहेत. प्रवाशांना सोयीसुविधा उपलब्ध नाही. स्व.राजीव गांधी उद्यान बसस्टॉप येथे नवीन बसलेल्या लाईट्स बंद पडल्या आहेत.बसची माहिती देणारे डिजिटल बोर्ड नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी वेळोवेळी लक्ष देणे आवश्यक होते. प्रवाशांना बीआरटी मार्गातून सुरक्षित प्रवास करता येईल का? असा प्रश्न पडला आहे. आता सर्व कामे पूर्ण करूनच बीआरटी मार्ग चालू करावा. - आदित्य गायकवाड, धनकवडी.