पुणे शहराला केंद्राकडुन लस मिळणार ही केवळ घोषणाच ठरली आहे. घोषणा केल्या पेक्षा अगदी थोड्याच लसी आल्यामुळे अनेक लसीकरण केंद्र आजही बंदच राहिली आहेत.
केंद्र सरकारकडून पुण्याला २ लाख ४८ हजार कोरोना लसी मिळणार असल्याची घोषणा काल महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली होती. यात पुणे शहराला ४० टक्के, ग्रामीणला ४० टक्के आणि पिंपरी-चिंचवडला २० टक्के लस मिळणार असेही सांगण्यात आले होते. रविवारीही पुणे जिल्ह्याला १ लाख २५,००० लस मिळणार असाही दावा करण्यात आला होता.
प्रत्येक्षात मात्र पुणे महापालिकेला फक्त ३०००० लसी मिळाल्या आहेत. तर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागासाठी फक्त ५०००० लसी मिळाल्या आहेत. आधीच तुटवडा असलेल्याने कालच केंद्र बंद ठेवली होती. आता इतक्याच लसी आल्याने त्या नेमक्या वाटायच्या तरी कोणाला आणि कशा असा प्रश्न अधिकाऱ्यांना भेडसावतो आहे.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक पाहता केंद्राकडून सर्वाधिक लसींचा पुरवठा राज्याला होणे गरजेचे होते. अशी राज्य सरकारकडून मागणी केली जात आहे. लशीच्या तुटवड्यावरून केंद्र-राज्य सरकारमधील संघर्षाचा थेट फटका आता सर्वसामान्यांना बसला आहे. त्यामुळे कालच पुणे शहरात लसीकरण केंद्र बंद होण्यास सुरुवात झाली. मोहोळ यांच्या दाव्याने नागरिकांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे अनेकांवर लसीकरण केंद्रावर जाउन परत यायची वेळ आली. विकेंड लॅाकडाउन मध्ये केंद्रांवर कसेबसे पोहोचलेले नागरिक परत जावं लागल्याने संताप व्यक्त करत आहेत.