पुण्याच्या महापौरांचा मुख्यमंत्र्यांसमोर धक्कादायक खुलासा; कोरोनामुळे झालेल्या एक हजार मृत्यूची नाही नोंद!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 11:38 AM2020-07-31T11:38:06+5:302020-07-31T11:45:27+5:30
राज्याच्या विशेषत: मुंबईच्या तुलनेत पुणे शहराच्या मृत्यूदर समाधानकारक असल्याच्या प्रशासकीय दाव्याला महापौरांच्या विधानाने पूर्णपणे छेद.
पुणे : पुणे शहराचा कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर दोन टक्क्यांपर्यंत खाली आला असून, राज्याच्या विशेषत: मुंबईच्या तुलनेत पुणे शहरात ही समाधानकारक बाब असल्याचा दावा प्रशासकीय आकडेवारीतून आत्तापर्यंत वारंवार करण्यात आला. मात्र, या दाव्याला पूर्णपणे छेद देण्याचे काम पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीच केले असून, पुणे शहरात आत्तापर्यंत साधारणत: एक हजार कोरोनामुळे झालेले मृत्यू हे रोजच्या आकडेवारीत नोंदविलेच गेले नसल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे.
पुण्यात दररोज बारापेक्षा अधिक मृत्यू हे कोरोनाबाधितांचे असतात. मात्र मृत्यूपूर्वी त्यांची स्वॅब तपासणी नसल्याने ती गणना यात केली गेलेली नाही. पण मृत्यू पश्चात होणाऱ्या तपासणीत ते निष्पन्न झाले आहे, असे खुद्द ससून रूग्णालय प्रशासनाने केंद्रीय पथकाला सांगितले आहे. त्यामुळे पुण्यात साधारणत: साडेचारशे ते पाचशे मृत्यू अशारितीने महिन्याला होत असतील तर, पुण्याचा मृत्यूदर हा निश्चितच दुप्पटीने वाढणार आहे असेही त्यांनी 'लोकमत'शी बोलताना कबुल केले. हे सांंगतानाच मोहोळ यांनी, आकडेवारी लपविण्याचा यामागे कोणाचाही उद्देश नाही असेही स्पष्ट केले. ज्यांची स्वॅब तपासणी केली जाते किंवा जे कोरोनाबाधित म्हणून उपचार घेतात व त्यांच्यापैकी कोणाचा मृत्यू झाल्यास तोच आत्तापर्यंत प्रशासनाच्या आकडेवारीत देण्यात आला आहे. परंतु मृत्यू पश्चात स्वॅब घेता येत नाही व ‘आय सी एम आर’ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार, अशा मृत्यूची मृत्यूनंतर कोरोनाची चाचणी केलीही जात नाही. त्यामुळे ही नोंद आत्तापर्यंत घेतली गेली नसली तरी, मृत्यूनंतर संबंंधितांच्या छातीच्या एक्सरे मध्ये त्यांना कोरोनाची लागण झालेल्याचे निष्पन्न झाले आहे.
एखादी व्यक्ती आजारपण अंगावर काढते, कोरोनाची लक्षणे असली तरी लपविते अशांच्या बाबतीत मृत्यू पश्चात कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातच को मॉरबिड (अन्य आजार असलेले) रूग्ण शोधण्यास व त्यांच्यापर्यंत पोहचण्यास आरोग्य यंत्रणा कमी पडली असल्याचेही ते म्हणाले. परंतु, याचवेळी कोरोनाची लक्षणे असलेल्यांनी आजार लपविणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगत, शहरात कोरोनाचा ‘समुह संसर्ग’ (कम्युनिटी स्प्रेड) झालेला नसल्याचाही दावाही केला आहे.
------------
पुण्यातील न नोंदविल्या मृत्यूची माहिती मुख्यमंत्र्यांनाही दिली.
पुणे शहरात दररोज बारा पेक्षा अधिक मृत्यू हे कोरोनामुळे होतात पण ते कोरोना मृत्यूच्या आकडेवारीत गणले जात नाही. ही बाब आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच मृत्यू पश्चात कोरोनाचा संसर्ग झाला आहे हे समजत असल्याने, या मृत्यूच्या घटनांची चौकशी करावी व भविष्यात अशाप्रकारे मृत्यू होणार नाही याची दक्षता घेण्यातबाबत आपण प्रशासनास सूचना द्याव्यात असेही ठाकरे यांना सांगितले असल्याचे मोहोळ म्हणाले.
------------
नागरिकांनी आजार लपवू नये
मृत्यूपश्चात ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे, अशा बहुतांशी रूग्णांना इन्य आजार असल्याचे आढळून आले आहे. तसेच अनेक जण आपला आजार लपवितात व शेवटच्या क्षणी रूग्णालयात दाखल होतात. अशावेळी संबंधित रूग्णाचा घरातून रुग्णालयात दाखल करताना रुग्णवाहिकेतच अथवा रुग्णालयात गेल्यावर काही तासात मृत्यू होतो. त्यामुळे नागरिकांनी आपले आजार लपवू नये, अंगावर दुखणे काढू नये असे आवाहन केले. याचवेळी अन्य आजार असलेल्या रूग्णांपर्यंत वेळेत आरोग्य यंत्रणेने पोहचून त्यांना शोधून काढले पाहिजे असेही मोहोळ यांनी सांगितले.
-----------------------
महापालिकेच्या सर्व रुग्णवाहिकांमध्ये आॅक्सिजन सुविधा देणार
प्रत्यक्षात उजेडात न आलेले परंतु कोरोनाची बाधा असलेले बहुतांश मृत्यू रुग्णालयात जाताना झाले आहेत. या रुग्णांना रुग्णवाहिकेत आॅक्सिजन सुविधा मिळाली असती तर ते रोखता येतील. त्यामुळे महापालिकेच्या सर्व रुग्णवाहिका आॅक्सिजन सुविधांनी सज्ज ठेवण्यात याव्यात, अशा सूचना आपण महापालिका प्रशासनास देणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
----------------------------------------