पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागाने एमबीएच्या पहिल्या सेमिस्टरच्या स्टॅटेस्टिक विषयाचा कोड चुकीचा टाकल्याने १८० विद्यार्थ्यांच्या गुणांची अदलाबदल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका महिला कर्मचा-यास निलंबित करण्यात आले आहे.एमबीएच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होऊन वर्ष उलटले तरी त्यांना गुणपत्रिका देण्यात आल्या नसल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उजेडात आला होता. त्यापाठोपाठ आता १८० विद्यार्थ्यांना परस्पर अनुत्तीर्ण ठरविण्याचा आणखी एक पराक्रम पुढे आला आहे. याप्रकरणी भीम आर्मी संघटनेच्या वतीने विद्यापीठामध्ये आंदोलन करण्यात आले. परीक्षा विभागातील गैरप्रकार दूर करण्यात यावेत, याबाबतचे निवेदन भीम आर्मी संघटनेच्या वतीने प्रभारी कुलसचिव अरविंद शाळीग्राम यांना देण्यात आले. एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रथम सेमिस्टरच्या निकालामध्ये विषय कोड चुकीचा टाकला गेल्यामुळे निकालामध्ये चुका झाल्या आहेत. यासंदर्भात चौकशी करून एका महिला कर्मचाºयास निलंबित करण्यात आले आहे, असे प्रभारी कुलसचिव अरविंद शाळीग्राम यांनी स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्याने पेपरच्या फेरतपासणीसाठी अर्ज केला असता त्याला पेपरमध्ये मिळालेले गुण व प्रत्यक्षातील गुण यामध्ये तफावत असल्याचे निष्पन्न झाले.त्यातून विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये फेरफार झाल्याचा प्रकार उजेडात आला. परीक्षा विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका नाहक विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.परीक्षा विभागाच्या प्रमुखांना निलंबित करापरीक्षा विभागाकडून चुका होण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत, विद्यार्थ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे याप्रकरणी केवळ कर्मचाºयांना जबाबदार न धरता परीक्षा विभागाचे प्रमुख अशोक चव्हाण यांना तातडीने निलंबित करण्यात यावे, अशी मागणी भीम आर्मी संघटनेच्या वतीने कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
एमबीए विद्यार्थ्यांच्या गुणांची अदलाबदल, कोड चुकल्याने १८० विद्यार्थ्यांना फटका, एक महिला कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 5:21 AM