पुणे : ज्या डाॅक्टरांनी रुग्ण तपासायचे असतात, तसेच त्यांच्या शिक्षणाचा उपयाेग करून गंभीर रुग्णांवर उपचार करायचे असतात असे उच्च वैद्यकीय शिक्षण घेतलेले सात ते आठ डाॅक्टर हे महापालिकेच्या आराेग्य विभागात तथाकथित कार्यालयीन कामे करण्यात धन्यता मानत आहेत. एमडी, स्त्रीराेगतज्ज्ञ असे पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलेले डाॅक्टर महापालिका भवनात नुसतेच खुर्च्या उबवत बसले आहेत.
एकीकडे महापालिकेच्या रुग्णालयांत वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे. कमला नेहरू, कोथरूड येथील सुतार दवाखाना, येरवडा येथे असे तज्ज्ञ डॉक्टर नाहीत. अनेकदा प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला ‘गुंतागुंत’ असल्याचे सांगून ससूनला पाठवले जाते आणि तेथे त्यांचे ‘नॉर्मल’ बाळंतपण होते, ही वस्तुस्थिती आहे. त्यातच एमडी डाॅक्टरांची भरती केल्याने त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाचा वापर शहरातील पालिकेच्या दवाखान्यात येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना हाेणे अपेक्षित आहे. खासगीमध्ये या डाॅक्टरांची फी ७०० ते हजारांच्या घरात असते. मात्र, हे डाॅक्टर महापालिकेत चक्क कारकुनी करत बसले आहेत. हे डॉक्टर ‘पर्मनंट’ असून त्यांचा पगार दर महिना सव्वा ते दोन लाख रुपये पगार आहे. ऑफिस वर्क म्हणजे या विभागप्रमुखाकडून त्या विभागप्रमुखाकडे गप्पा मारत फिरण्याचेच महत्त्वाचे काम हे डॉक्टर करत आहेत.
सीझेरियन, आयपीडी नकाे रे बाबा!
या डाॅक्टरांना क्लास वनच्या खुर्चीवर बसायला फार आवडते. झाले तर केवळ सोनोग्राफी करण्याची तसदी ते घेतात तेदेखील आठवड्यातून दोन ते तीन वेळा. तर सीझेरियन प्रसूती, आयपीडी या किचकट गोष्टी त्यांना नको आहेत. जर हे तज्ज्ञ डॉक्टर महापालिकेच्या १८-१९ प्रसूतिगृहात गेले तर कमला नेहरू आणि ससूनवरील भार हलका होण्याला मदत होईल. मात्र हे स्त्रीरोगतज्ज्ञ कार्यालयात बसून, क्लार्कप्रमाणे फायली घेऊन फिरण्याचे काम करतात. दोन-दोन वर्षे एके ठिकाणी क्लार्कचे काम करत बसवले जात असल्याने त्यांना ऑपरेशनचा सरावही राहात नाही.
रेडिओलाॅजिस्टचे कामही एमडीकडे
महापालिकेच्या ‘पे रोल’वर तीन रेडिओलॉजिस्टही आहेत. त्यांनी सोनोग्राफी करणे आवश्यक आहे, असे असताना ‘एमडी’ आणि क्लासवन असलेले डॉक्टर सोनोग्राफी करतात.
''महापालिकेत एकही डॉक्टर अतिरिक्त नाही. हे सगळे डाॅक्टर कामाचे असून म्हणून त्यांना येथे बसवले आहे. याशिवाय रुग्णालयांमध्ये, ओपीडीमध्ये पुरेसे मनुष्यबळ आहे. - डॉ. आशिष भारती, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका''