लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) गहुंजे (जि. पुणे) येथील क्रिकेट मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान खेळली जाणारी तीन सामन्यांची एकदिवसीय क्रिकेट मालिका बुधवारपासून (दि. २३) सुरू होत आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे तिन्ही सामने प्रेक्षकांविना खेळले जाणार असल्याने ‘एमसीए’ला सुमारे नऊ-साडेनऊ कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे.
एमसीए मैदानाची प्रेक्षकक्षमता २८ हजार आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या तिकीट विक्रीतून एका सामन्याला तीन-साडेतीन कोटी रुपये एमसीएला मिळतात. मात्र यंदा कोरोना साथीमुळे प्रेक्षकांशिवाय सामने आयोजित करण्याची परवानगी राज्य सरकारने ‘एमसीए’ला दिली आहे.
‘एमसीए’चे अध्यक्ष विकास काकतकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, “क्रिकेट सामन्यांच्या आयोजनातून प्रामुख्याने तीन प्रकारे आयोजकांना उत्पन्न मिळते. एक असते तिकीटविक्री. मात्र यंदा तो पर्याय बाद झाला आहे. ‘इन स्टेडिया राईट्स’ हा दुसरा महत्त्वाचा मार्ग आहे. मैदानातील जाहिरातींद्वारे हे उत्पन्न मिळते. या वेळी एका सामन्यासाठी या माध्यमातून तीन कोटी रुपये याप्रमाणे तीन सामन्यांचे नऊ कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे. सामन्याच्या आयोजनासाठी भारत क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) स्थानिक संघटनेला ठराविक रक्कम देते. या माध्यमातून एमसीएला साडेचार कोटी रुपये मिळतील.”
शून्य प्रेक्षकसंख्येमुळे थेट नऊ-साडेनऊ कोटी रुपयांच्या आर्थिक नुकसानापेक्षाही पुण्यातील क्रिकेटरसिक सामन्याच्या आनंदाला मुकणार हे नुकसान मोठे आहे. यापूर्वी ‘एमसीए’ने अगदी तीनशे रुपयांपासून सर्वसामान्य क्रिकेट रसिकांना तिकिटे उपलब्ध करुन दिली आहेत. शालेय विद्यार्थ्यांना अत्यल्प काही वेळा विनामूल्य सामन्यांचा आनंद लुटू दिला आहे. कोरोनामुळे ही संधी या वेळी पुणेकर क्रिकेटरसिकांना मिळणार नाही.
चौकट
एवढा येतो खर्च
“प्रेक्षकांविना खेळल्या जाणाऱ्या एका एकदिवसीय सामन्याच्या आयोजनासाठी ७० ते ८० लाख रुपये खर्च येतो. एरवी स्टेडियम प्रेक्षकांनी भरलेले असेल तर हाच खर्च दोन कोटी रुपयांच्या घरात जातो. यात मोठा खर्च सुरक्षा व्यवस्थेचा असतो. मात्र एका सामन्यामुळे हजारो हातांना रोजगार मिळतो. ‘एमसीए’ला तिकीटविक्रीतून काहीच उत्पन्न मिळणार नसले तरी अन्य उत्पन्न सुमारे बारा-तेरा कोटींपर्यंत जाईल.” -विकास काकतकर, अध्यक्ष, एमसीए
चौकट
‘एमसीए’चा इतिहास
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावरील पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना १३ ऑक्टोबर २०१३ रोजी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारताचा ७२ धावांनी पराभव झाला. या मैदानावरील शेवटचा एकदिवसीय सामना २७ ऑक्टोबर २०१८ या दिवशी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळला गेला. याही सामन्यात भारत वेस्ट इंडिजकडून ४३ धावांनी पराभूत झाला. या व्यतिरिक्त इंग्लंड (१५ जानेवारी २०१७) आणि न्यूझीलंड (२५ ऑक्टोबर २०१७) यांच्याविरुद्ध भारताने दोन सामने येथे खेळले आहेत. या दोन्ही सामन्यांत मात्र भारत विजयी झालाय. आजवर येथे खेळल्या गेलेल्या चारपैकी दोन सामन्यांत विजय, दोनमध्ये पराभव ही भारताची कामगिरी आहे.