पुणे : सिंहगड रोड परिसरात दहशत माजविणाऱ्या निरज ढवळे व त्यांच्या ७ साथीदारांवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार (मोक्का) कारवाई केली आहे.
टोळीप्रमुख निरज लक्ष्मण ढवळे (वय २२, रा. साईनगर, हिंगणे खुर्द), सूरज संतोष ढवळे (वय १९, रा. वाघजाई मंदिराजवळ, साईनगर, हिंगणे खुर्द), अनिकेत/अँडी देविदास कांबळे (वय २०, रा. तुकाईननगर, वडगाव बुद्रुक), किरण विठ्ठल शिंदे (वय२०, रा. भूमकर मळा, नऱ्हे), आतिश राम पवार (वय ३०, रा. वडगाव) व तीन विधी संघर्षित बालके अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहे. पोलिस आयुक्त गुप्ता यांनी या वर्षातील ही ५० वी आणि एकूण ११३ वी मोक्का कारवाई आहे.
निरज ढवळे व त्यांचे साथीदार यांनी सिंहगड रोड परिसरात टोळीचे वर्चस्व निर्माण व्हावे यासाठी मारामारी करणे, खुनाचा प्रयत्न करणे, कोयता आणि इतर घातक शस्त्रे जवळ बाळगून दंगा करणे अशा प्रकारे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केल्यानंतरही त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. त्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संख्ये यांनी पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा यांच्यामार्फत मोक्का कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता. अपर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून त्याला मंजुरी दिली.