पुणे :बिबवेवाडी परिसरात दहशत माजविणाऱ्या गुंड योगेश जगधने आणि साथीदारांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले. याप्रकरणी योगेश रमेश जगधने (वय २६), उमेश रमेश जगधने (वय ३१), विकास उर्फ सोन्या गंगाराम राठोड (वय २३, तिघे रा. बिबवेवाडी) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाविरोधात मोक्का कारवाई केली आहे.
जगधने आणि साथीदारांनी बिबवेवाडी भागात दहशत माजवली होती. खुनाचा प्रयत्न, दरोडा, शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करणे, जीवे मारण्याची धमकी, असे गंभीर गुन्हे जगधने आणि साथीदारांविरोधात दाखल आहेत. एका गुन्ह्यात जगधने, राठोड येरवडा कारागृहात आहेत. या टोळीविरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव बिबवेवाडी ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता जाधव यांनी तयार केला. पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यामार्फत अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे पाठविला. शर्मा यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.
नवनियुक्त पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील चार गुंड टोळ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.