पुणे : पर्वती परिसरात दहशत माजवणाऱ्या सराईत बिपीन मापारीसह त्याच्या टोळीविरोधात मोक्का कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी केलेली ही ४५ वी कारवाई आहे. त्यामुळे विविध भागातील सराईत गुंडांची कारागृहात रवानगी केली आहे. बिपीन मिलिंद मापारी (२४, टोळी प्रमुख), ऋषिकेश ऊर्फ भावड्या बबन धिवार (२१), निरज सुनील खंडागळे (२०) विशाल ऊर्फ दौलत पिराजी आगम (३४ सर्व रा. दत्तवाडी ) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
आरोपी बिपीन मिलिंद मापारी याच्याविरोधात सात, तर ऋषिकेश धिवार याच्यावर ५ गुन्हे दाखल आहेत. मागील १० वर्षात या टोळीने नागरिकांना धमकवणे, लुटमार करणे, खुनाचा प्रयत्न, घातक हत्यारांनी जबर दुखापत, बेकायदेशीर जमाव जमवणे, बेकायदेशीररित्या शस्त्र जवळ बाळगणे, असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. त्यांच्याविरुद्ध पर्वती ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी मोक्काचा प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मापारी टोळीविरुद्ध कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे करत आहेत.
टोळीने तरुणावर केला होता वार :
फिर्यादी तरुण हा त्याच्या मित्रासोबत फोनवर बोलत असताना आरोपी ऋषी उर्फ भावड्या, बिपिन आणि दौलतने त्याला हटकले. स्वप्निल उर्फ बाबा जगताप याच्याकडे रागाने का बघत असतो, तो आमचा मित्र आहे, तुला खूप माज आला आहे का असे म्हणून तरुणावर हत्याराने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.