पुणे : शहरातील विमाननगर भागात दहशत माजवणाऱ्या प्रसाद उर्फ चिक्या गायकवाड गुंड टोळीविरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ५२ टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे.
याप्रकरणी प्रसाद उर्फ चिक्या संपत गायकवाड (२५, रा. महादेवनगर, वडगाव शेरी), अरबाज अयुब पटेल (२४, रा. बुद्ध विहारजवळ, नागपूर चाळ, येरवडा) आणि बबलू संतोष गायकवाड (२२, रा. संजय पार्क, विमाननगर) यांच्याविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. विमाननगर भागात एका विक्रेत्याला धमकावून या तिघांनी त्याला लुटले होते. गायकवाड, पटेल सराईत आहेत. त्यांच्याविरुद्ध दरोडा, तोडफोड, दहशत माजवणे, शस्त्रे बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
या टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, गुन्हे शाखेच्या निरीक्षक संगीता माळी यांनी तयार केला होता. अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्याकडे प्रस्ताव पडताळणीसाठी पाठवण्यात आला होता. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी गायकवाड आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.