पुणे : रस्त्यात तरुणाला व त्याच्या मित्राला अडवून हातातील लोखंडी हत्याराने व लाकडी बांबूने मारहाण करून जबरदस्तीने खिशातील ७०० रुपये काढून घेत परिसरात दहशत माजवणाऱ्या आविनाश ऊर्फ आव्या सुरेश गंपले व त्याच्या अन्य ३ साथीदारांवर पोलिस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत १०३ संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.
याप्रकरणी आविनाश सुरेश गंपले ऊर्फ आव्या (१९, रा. महादेव मंदिराजवळ, वारजे माळवाडी), सतीश पवन राठोड ऊर्फ सत्यपाल (१८, रा. विठ्ठलनगर पाण्याच्या टाकीजवळ, वारजे माळवाडी), विशाल संजय सोनकर (१९, रा. विद्याविहार सोसायटी, दांगट पाटील नगर, शिवणे) व एका अल्पवयीन मुलावर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. वारजे-माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्काचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या अर्जाची छाननी करून अप्पर पोलिस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. या प्रकरणाचा पुढील तपास कोथरूड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त भीमराव टेळे करत आहेत.
ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेशकुमार, सहपोलिस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार), अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा, कोथरुड विभागाचे
सहायक पोलिस आयुक्त भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल जैतापुरकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजय कुलकर्णी, सहायक पोलिस निरीक्षक अमोल ओलेकर, पोलिस उपनिरीक्षक तृप्ती पाटील, निगराणी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक विशाल मिंडे, पोलिस अंमलदार संभाजी दराडे, विजय खिलारी, नितीन कार्तुर्डे, ज्ञानेश्वर गुजर, रामदास गोणते यांच्या पथकाने केली.