पुणे :हडपसर भागात घातक शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या अक्षयसिंग बिरूसिंग जुन्नी याच्यासह ३ जणांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचा आदेश दिला. पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत शहरातील ५१ गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे.
टोळीप्रमुख अक्षयसिंग बिरूसिंग जुन्नी (वय २२, रा. वैदवाडी, हडपसर), कुलदीपसिंग ऊर्फ जोग्या चंदनसिंग जुन्नी (वय २१, रा. बिराजदारनगर, हडपसर), विशाल ऊर्फ मॅक्स किशोर पुरेबिया (वय २२, रा. वैदवाडी, हडपसर), अशी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झालेल्यांची नावे आहेत. अक्षयसिंग बिरूसिंग जुन्नी आणि इतर आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घरफोडी, चोरी यासारखे गंभीर स्वरूपाचे १४ गुन्हे दाखल आहेत.
जुन्नी आणि त्याच्या साथीदारांनी आपापसात संगनमत करून फिर्यादीस आणि सहकाऱ्यांना मारहाण करीत फलक आणि बॅनर लावायचे असल्यास हप्ता द्यावा लागेल, असे सांगितले होते. फिर्यादी आरोपींना १ हजार रुपये दिले आणि आता पैसे नसल्याने बाकीचे पैसे नंतर देतो, असे सांगितले होते. याचा राग मनात धरून जुन्नी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फिर्यादी यांना धारधार शस्त्राने मारहाण केली होती.