पुणे : खडकी परिसरात घरफोडी व जबरी चोरी करणाऱ्या सुंदरसिंग भायानसिंग भुरीया व त्याच्या ३ साथीदारावर पोलिस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली. आरोपींनी सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीला धक्काबुक्की करुन जबरदस्तीने २ हजार १०० रुपये काढून घेतले होते. ही घटना ६ ऑक्टोबर रोजी बोपोडी येथील भाऊ पाटील रोडवर घडली होती. याप्रकरणी टोळी प्रमुख सुंदरसिंग भयानसिंग भुरीया (२५), मुकेश ग्यानसिंग भुरीया (२७, दोघे रा. ग्राम पिपराणी, जि. धारा मध्य प्रदेश), सुनिल कमलसिंग आलावा (२८) आणि हरसिंग वालसिंग ओसनिया (२२, दोघे रा. तहसील कुक्षी, थाना बागमेर, जि. धारा, उत्तर प्रदेश) यांच्यावर खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
टोळी प्रमुख सुंदरसिंग भुरीया याचे पूर्वीचे रेकॉर्ड तपासले असता त्याने चोरी, घरफोडी, जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. तसेच त्याने गुन्हेगारांची संघटित टोळी तयार केली. या टोळीने बेकायदेशीर मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्यासाठी हिंसाचार करण्याची धमकी देऊन किंवा धाक दाखवून गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र, आरोपींच्या वर्तनात सुधारणा झाली नाही.
खडकी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्का कायद्याचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी परिमंडळ ४ चे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्फत पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलिस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास खडकी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे करत आहेत.
ही कामगिरी सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील, उपनिरीक्षक संजय भांडवलकर, उपनिरीक्षक वैभव मगदुम, सर्वेलन्स अंमलदार रमेश जाधव, महिला पोलिस अंमलदार किरण मिरकुटे आणि स्वाती म्हस्के यांच्या पथकाने केली. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार स्विकारल्यापासून ९० संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.