पुणे : राज्यातील शासकीय तांत्रिक विद्यालयातील किमान कौशल्यावर आधारीत व्यवसाय अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) बंद करण्यात येणार आहेत. या अभ्यासक्रमांऐवजी येत्या शैक्षणिक वर्षापासून औद्योगिक प्रशिक्षण संस्थां (आयटीआय) मधील अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन असून त्यावर लवकर शिक्कामोर्तब होईल. प्रत्येक विद्यालयामध्ये दोन तुकड्या सुरू केल्या जाणार असून त्यांचे प्रवेश व परीक्षा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाकडूनच होणार आहे.देशभरात तांत्रिक विद्यालयांमध्ये १९८९-९० मध्ये ‘एमसीव्हीसी’ अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. राज्यात सध्या ५३ तांत्रिक विद्यालये असून सुमारे ३ हजार २०० एवढी ‘एमसीव्हीसी’ची प्रवेश क्षमता आहे. यामध्ये सुमारे ३० अभ्यासक्रम असून प्रत्येक विद्यालयामध्ये तीन ते चार अभ्यासक्रम घेतले जातात. या अभ्यासक्रमांच्या परीक्षा राज्य शिक्षण मंडळमार्फतच घेतल्या जातात. तसेच इयत्ता अकरावीसोबत प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. तर ‘आयटीआय’ची प्रवेशक्षमता सुमारे १ लाख ३४ हजार असून व्यवसाय शिक्षण विभागाकडून प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. तर केंद्रीय पातळीवरून ‘आयटीआय’मधील अभ्यासक्रमांची परीक्षा घेतली जाते. ‘आयटीआय’मध्ये राज्यात सुमारे १०४ विविधप्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रम आहेत. कौशल्य विकास व व्यवसाय शिक्षण विभागाने ‘आयटीआय’चा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तांत्रिक विद्यालयांमधील ‘एमसीव्हीसी’ अभ्यासक्रमांचे रुपांतर ‘आयटीआय’मधील अभ्यासक्रमांमध्ये केले जाणार आहे. हे अभ्यासक्रम या विद्यालयांच्या अंतर्गतच घेतले जाणार आहेत. विद्यालयांमधील व्दिलक्षी व इयत्ता नववी व दहावीचे व्यवसाय अभ्यासक्रम सुरू राहणार आहेत. सध्या तांत्रिक विद्यालयांमध्ये एमसीव्हीसीची केवळ एकच तुकडी आहे. त्यामध्ये बदल करून ‘आयटीआय’ अभ्यासक्रमाच्या दोन शिफ्ट करण्यात येणार असून गरजेनुसार सहा अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. दोन शिफ्ट केल्यामुळे राज्यभरात सुमारे दहा हजार प्रवेश क्षमता होणार आहे. परिणामी अधिकाधिक विद्यार्थ्यांना व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये प्रशिक्षण मिळणार आहे. त्याचप्रमाणे उद्योग क्षेत्राच्या मागणीनुसार हे अभ्यासक्रम असतील. याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.तांत्रिक विद्यालयांमध्ये ‘एमसीव्हीसी’च्या अभ्यासक्रमांचे रुपांतर ‘आयटीआय’च्या अभ्यासक्रमांमध्ये केले जाणार आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांचे प्रवेश व्यवसाय शिक्षण विभागाकडून आयटीआयप्रमाणे केले जाणार आहेत. तसेच या अभ्यासक्रमांची परीक्षाही राज्य शिक्षण मंडळाऐवजी केंद्रीय प्रशिक्षण संचालनालयामार्फत घेतल्या जातील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.खासगी संस्थांमधील ‘एमसीव्हीसी’चे तळ्यात गळ्यात राज्यातील खासगी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या ‘एमसीव्हीसी’ अभ्यासक्रमांतील प्रवेश व कर्मचाऱ्यांची माहिती व्यवसाय शिक्षण विभागाकडून मागविण्यात आली आहे. सध्या या अभ्यासक्रमांबाबत चर्चा सुरू असून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, भविष्यात या अभ्यासक्रमांऐवजी ‘आयटीआय’चे अभ्यासक्रम सुरू केले जाऊ शकतात, असे समजते.
--------------------