लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सध्या पुणे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. यामुळेच ग्रामीण भागातील रुग्णांना ग्रामीण भागातच चांगले दर्जेदार उपचार उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने तातडीने ३० एमडी आणि १०० एमबीबीएस डॉक्टरांची भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात यासाठी जाहिरात देऊन योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हा परिषदेच्या वतीने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, नवी दिल्ली, पश्चिम बंगाल, पंजाब, बिहार, ओडिशा, आसाम आणि उत्तर प्रदेश या बारा राज्यांत जाहिरात केली आहे. यामुळे ग्रामीण भागासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध होईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार आयुष प्रसाद यांनी सांगितले.
सध्या पुण्यात शहरी भागाच्या बरोबरीनेच ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. शहरी भागात खासगी हाॅस्पिटलच्या सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु ग्रामीण भागात ८० टक्क्यांपेक्षा अधिक लोक हे सरकारी आरोग्य सेवेवर अवलंबून राहावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने मोठ्या प्रमाणात कोविड केअर सेंटर, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथे कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी सुविधा निर्माण केल्या आहेत. मात्र आरोग्य कर्मचारी, डाॅक्टर उपलब्ध नसल्याने सुविधा निर्माण करून देखील रूग्णांना उपचार देता येत नाहीत. यासाठीच जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये आतापर्यंत शासनाने पुणे जिल्हा परिषदेसाठी डाॅक्टर, नर्स, आरोग्यसेविका, वाॅर्डबाॅयसह औषध निर्माता, भूलतज्ज्ञ अशी विविध पदे भरली आहेत. एमडी डाॅक्टर आणि एमबीबीएस डॉक्टर देखील मोठ्याप्रमाणात उपलब्ध करून देणार आहे. यासाठी आता महाराष्ट्रासह देशातील अन्य १२ राज्यांत देखील जिल्हा परिषदेच्या वतीने जाहिरात करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात एमडी आणि एमबीबीएस डॉक्टरांची भरती केवळ कोविड साथीसाठी करण्यात येणार असून, यात एमडी डाॅक्टरांना दरमहा दीड लाख, तर एमबीबीएस डॉक्टरांना दर महा ९० हजार रुपये पगार देणार आहे.
--
जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची कोविडसाठी मदत
पुणे जिल्हा ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी मदत करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार म्हणजे एक कोटी ९७ लाख रुपये पुणे जिल्हा परिषदेला ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्यासाठी व कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी मदत म्हणून दिले आहेत.