“आम्ही आमच्या मुलींचं लग्न कोणत्या जातीत करायचं किंवा कोणाशी करायचं हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही, ” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार दत्तात्रय भरणेंना सुनावलं. इंदापूर तालुक्यातील माळवाडी येथे सुप्रिया सुळेंची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी संतप्त सवाल केला. तसंच उपस्थितांमध्ये मुलींना तुम्हाला आम्ही तुमचं लग्न ठरवलेलं चालेल का? असा सवालही केला.
“माझ्या मुलीचं लग्न माझी मुलगी ठरवेल किंवा माझे पती सदानंद आणि मी ठरवू. दादा मामा म्हणून रेवतीचं लग्न कोणाशी करायचं हे ठरवतील. पण भरणे मामा किंवा राज्याचे मुख्यमंत्री हे सागू शकत नाहीत. आम्ही मुख्यमंत्री आहोत तुमची मुलगी याच्याशी लग्न करेल, असे ते म्हणू शकत नाहीत. आम्ही आमच्या मुलींना शिक्षण दिलंय. त्यांचे निर्णय त्याच घेतील,” असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.
“माझी मुलगी काय खाईल, कोणाशी लग्न करायचं, कसं जगेल हे आम्ही कुटुंब ठरवू नाहीतर ती स्वत: निर्णय प्रक्रियेत असेल. भाजपला मी तो अधिकार दिलेला नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही हा अधिकार कोणालाही दिलेला नाही. जे आता शिकवतात, जे या राज्यात चाललंय, ते देशाच्या आपल्या समाजाच्या, आपल्या संविधानाच्या विरोधात चाललं आहे. माझा लढा त्यांच्या वैयक्तिक विरोधात नाही. माझा लढा या संविधानासाठी आहे,” असंह त्यांनी स्पष्ट केलं.