स्वयंसेवी संस्था, कंपनी व उत्पादकांस जिल्हा परिषदेचे आवाहन
पुणे : जिल्ह्यातील प्रत्येक गावा-गावांत घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी तज्ज्ञांनी आपल्याकडील माहिती जिल्हा परिषदेला सादर करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेने तज्ज्ञ स्वयंसेवी संस्था, कंपनी, तसेच उत्पादकांना केले आहे.
जिल्ह्यात वाढत्या नागरीकरणामुळे गावांमध्ये घनकचरा समस्या निर्माण होत आहे. यासाठी जिल्हा परिषद, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत गावस्तरावर शाश्वत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करून गावे हागणदरीमुक्त करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहेत. यामध्ये कचरा संकलन, कचरा वाहतूक, कचरा वर्गीकरण व कचऱ्यावर पारंपरिक व आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे प्रक्रिया करून विविध उत्पादने तयार करून त्याची विक्री करण्याचे नियोजन आहे.
याक्षेत्रात काम करणारे व्यक्ती, संस्था, सेवाभावी संस्था यांच्याकडून आधुनिक तंत्रज्ञान विषयक सहकार्य व शास्त्रोक्त मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. तसेच, घनकचरा व्यवस्थापनशी संबंधित उत्पादित उपकरणांचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी घनकचरा व्यवस्थापनशी संबंधित उपकरणे उत्पादक, विक्रेते यांच्याकडील उपकरणाची माहिती घेण्यात येणार आहे.
... या पत्त्यावर द्या माहिती
घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात काम करणारे करणारे व्यक्ती, संस्था, सेवाभावी संस्था यांनी त्यांच्याकडे असलेले तज्ज्ञ व्यक्तींची माहिती व त्याचे सादरीकरण तसेच घनकचरा व्यवस्थापनशी संबंधीत उत्पादित करणारे उपकरणे उत्पादक कंपनी, विक्रेते यांनी त्यांच्याकडील उत्पादित उपकरणाची सविस्तर माहिती, दर, वापर, तंत्रज्ञान, उपयोग आदींची माहिती असलेले पत्रक व याबाबत तज्ज्ञ व्यक्तींचे नाव व त्यांचा संपर्क क्रमांकसह २४ मे २०२१ सांय. ५ वाजेपर्यंत nbazppune@gmail.com या इमेल व स्वच्छ भारत मिशन (ग्रा) कक्ष, पुणे जिल्हा परिषद या पत्यावर व त्यांचे सादरीकरण सादर करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.