लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यात यांत्रिक भात रोप लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. खर्च कमी व उत्पन्नात भरघोस वाढ ही या पद्धतीची वैशिष्ट्ये आहेत.
जिल्ह्यात १४० हेक्टरवर सध्या प्रयोग केला जात आहे. एरवीच्या पारंपरिक पद्धतीत शेतकरी गादी वाफ्यावर रोपे धरतात व नंतर मजुरांच्या साह्याने लागवड करतात. यात रोपे समान अंतरावर लागत नाहीत. त्यामुळे हवा, पाणी, उन व्यवस्थित मिळत नाही. खतांची मात्राही नीट देता येत नाही. कृषी विभागाच्या तंत्र अधिकारी वर्षा यादव-जाधव यांनी ही माहिती दिली.
यांत्रिक लागवडीत हे सर्व दोष निघून जातात. यामध्ये मॅटवर रोपे तयार करतात. नंतर ती यंत्राद्रारे लावली जातात. समान अंतरावर लागवड झाल्याने सर्व रोपांना हवा, पाणी, उन पुरेशा प्रमाणात मिळते. खतांची मात्राही यंत्रानेच दिली जाते, असे वर्षा यादव-जाधव यांनी सांगितले.
यामुळे एकरी २ हजार रुपयांचा खर्च वाचतो. लावणीच्या काळात मजूर टंचाईमुळे वेळ जातो. लागवड वेळेवर होत नाही. यंत्रामुळे ही अडचण दूर होणार आहे. यांत्रिक लागवडीनंतर रोपांची वाढ नीट होते, फुटवे जास्त येतात. ओंबी लवकर धरते. यातून उत्पन्न किमान २५ टक्के वाढते. जिल्ह्यात यंत्राद्वारे सध्या ४० हेक्टरवर अनुदानित व १०० हेक्टरवर विनाअनुदानित भात लागवड करण्यात येते. एका हेक्टरला ९ हजार रुपये अनुदान मिळते. कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रथमच हा प्रयोग राबवण्यात येत असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यंत्राद्वारे भातलागवड करावी हा प्रयत्न असल्याचे कृषी विभागाने सांगितले.