कोथरूड (पुणे) : पुण्यातील कोथरूड येथील एमआयटी परिसरात खासदार मेधा कुलकर्णी यांनी श्री राम जयंतीनिमित्त आयोजित केलेला कार्यक्रम डीजे वाजवत असल्याच्या कारणावरून बंद केला. ही घटना बुधवारी रात्री आठ ते साडेआठ वाजता घडली असून, यानिमित्त परिसरातील काही युवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
‘सियाराम प्रतिष्ठान’ने राम नवमीनिमित्त कार्यक्रम आयाेजित केला हाेता. राम नवमीच्या कार्यक्रमात अन्य प्रकारची गाणी वाजवली जात असल्याने ताे बंद करावा, अशी भूमिका परिसरातील नागरिकांनी घेतली. तसेच, आवाजाचे प्रमाणही जास्त आहे असे सांगण्यात आले. त्याबाबत नागरिकांनी खासदार कुलकर्णी यांना तक्रार केली. त्या तेथे आल्या व त्यांनी ताे बंद करायला सांगितला. यावेळी माेठ्या प्रमाणात पाेलिस बंदाेबस्तही हाेता.
एमआयटी रोड संबंधित भागात कॉलेज परिसरातील मुलांनी मोठ्या आवाजात डीजेवर गाणे लावले होते. त्यात हे गाणे हिंदी चित्रपटातील होते. श्रीराम नवमी संबंधित गाणे न वाजवता इतर लैला-मजनूची गाणी या ठिकाणी वाजत होती. मला रामबाग कॉलनी परिसरातून फोन आला, की येथे असा प्रकार सुरू आहे. नागरिकांना समस्या निर्माण होत असेल, तर असा प्रकार आम्हाला मान्य नाही.
- डॉ. मेधा कुलकर्णी, खासदार राज्यसभा
या देशात आम्ही श्रीराम नवमी साजरी करावी की नाही? आम्हाला राम नवमी येथे साजरी करू दिली गेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यावर देशात उत्सव साजरा करण्यात आला. मात्र, आज रामनवमी दिवशी आम्हाला येथे बंधने लादली जात आहेत.
- एक राम भक्त युवक, कोथरूड