प्रसाद कानडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांची ४० कोटींहून अधिक रकमेची वैद्यकीय बिले एसटीने थकवली आहेत. बिले भरण्यासाठी कोणी नातेवाईकाकडून उसने पैसे घेतले आहेत, तर कुणी गावाकडची जमीन गहाण टाकली आहे. जवळपास दीड वर्ष होत आले, तरी एसटीने बिलाचा परतावा दिलेला नाही.
कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारी रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नाहीत. यास्थितीत खासगी रुग्णालयात दाखल होण्याची पाळी अनेक कर्मचाऱ्यांवर ओढवली. खासगी रुग्णालयांची महागडी बिले भरताना मेटाकुटीला आलेेल्या कर्मचाऱ्यांना एसटी प्रशासनाकडून बिले घेण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे.
राज्य परिवहन महामंडळाने कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा काढला आहे. मात्र, तो कॅशलेस स्वरूपाचा नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कोणत्याही वैद्यकीय उपचाराचा खर्च आधी स्वत:च्या खिशातून करावा लागतो. नंतर एसटीकडून त्याची नियमानुसार रक्कम दिली जाते. मात्र, गेल्या दीड वर्षापासून ही रक्कमच दिली गेलेली नाही. हा थकलेला आकडा ४० कोटी रुपयांहून जास्त असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एसटीची सध्याची डळमळीत आर्थिकस्थिती लक्षात घेता तो लगेच मिळेल अशीही खात्री कर्मचाऱ्यांना नाही. मात्र, एसटीकडून पैसे मिळतील, या भरवशावर ज्यांनी कर्जावू रक्कम घेतली, शेतजमीन गहाण ठेवले अशा कर्मचाऱ्यांनी काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चौकट
स्थिती सुधारेपर्यंत थांबा
“एसटीची आर्थिक परिस्थिती सध्या ठीक नाही. त्यामुळे बिल थकले असतील. वैद्यकीय बिले हा विभाग स्तरावरचा प्रश्न असल्याने मला याबाबत अधिक काही सांगता येणार नाही. एसटीची आर्थिक स्थिती सुधारल्यावर प्रलंबित बिले निश्चितच दिली जातील.”
डॉ. शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, राज्य परिवहन महामंडळ, मुंबई.
चौकट
तातडीने बिले मिळावीत
“एस.टी. कर्मचाऱ्यांना एक तर वेतन कमी आहे. त्यात कोरोना संकटात सरकारी रुग्णालयात जागा नसल्याने नाईलाजाने खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. हे त्यांच्या आवाक्या बाहेरचे असून त्यांना वैद्यकीय बिलाची रक्कम तत्काळ मिळाली पाहिजे.”
-श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस