पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. येरवडा कारागृहातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय काशिनाथ मर्साळे (वय ५३) याला गुन्हे पोलिसांनी अटक केली आहे.
ललित पाटील याचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढविण्यासाठी त्याला मदत केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी ही अटक केली आहे. ललित पाटील याचा आजारावर कारागृहात उपचार करणे शक्य असतानाही त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यासाठी डॉ. मर्साळे याने मदत केली होती.
यापूर्वी ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते (वय ५७, रा. रक्षकनगर, खडकी) याच्यासह कारागृह रक्षक मोईस अहमद शेख (वय ३०, रा. मूळ रा. देगलूर, नांदेड), समुपदेशक सुधाकर सखाराम इंगळे (वय ४४) यांना अटक करण्यात आली होती. यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यात डॉ. संजय मर्साळे याचा सहभाग दिसून आला. तसेच मर्साळे हे या आरोपींशी सातत्याने संपर्कात होते. तसेच ललित पाटील यालाही त्याने अनेकदा फोन केल्याचे आढळून आले आहे. पोलिस निरीक्षक बिडवई पुढील तपास करत आहेत