बारामती : आयएमएने संप मागे घेतल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून बंद असलेली वैद्यकीय सेवा पूर्ववत झाली. त्यामुळे शहरातील रुग्णांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, खासगी वैद्यकीय सेवा बंद असल्याने संप काळात सरकारी दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याचे चित्र आहे.बुधवारी (दि. २२) दुपारपासूनच शहरातील खासगी वैद्यकीय सेवा बंद होती. अनेक रुग्णांनी उपचारासाठी सरकारी रुग्णालयांमध्ये धाव घेतली. यामध्ये प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांचे प्रमाण देखील अधिक असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. मिरा चिंचोलीकर यांनी सांगितले की, संपाच्या काळात दैनंदीन रुग्ण संख्येमध्ये दिड पटीने वाढ झाली. वाढ झालेल्या रुग्णांना चांगल्या प्रकारे वैद्यकीय सेवा देण्याचे नियोजन केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ महेश जगताप यांनी सांगितले की, तालुक्यात खासगी वैद्यकीय सेवा बंद असलेल्या ठिकाणी शासकीय आरोग्य केंद्रामध्ये १५ ते २० टक्के रुग्णांची संख्या वाढली. नुकताच जिल्हा परीषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारलेल्या विश्वास देवकाते यांनी संप काळात रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा द्यावी. रुग्णांना तातडीची उपचार सेवा द्यावी, अशा सूचना केल्या. त्याप्रमाणे बारामती तालुक्यातील आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय उपचाराचे नियोजन केले. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयांमध्ये रूग्णांची संख्या देखील तुलनेने वाढली, असे डॉ. जगताप यांनी सांगितले. तर महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापू भोई यांनी सांगितले की, उपचारासाठी महिला रुग्णालयात येणाऱ्या रु ग्णांमध्ये १० टक्के वाढ झाली. प्रसुतीसह इतर उपचारासाठी येणाऱ्या महिलांचा यामध्ये समावेश होता.आयएमएचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे यांनी सांगितले, की आज दुपारी मुख्यमंत्र्यासमवेत झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेण्यात आला. दुपारी १ वाजता आयएमएने संप मागे घेतला. मुख्यमंत्र्यांसमवेत मागण्यांबाबत चर्चा झाल्याचे डॉ. तांबे यांनी सांगितले.
बारामती शहरातील वैद्यकीय सेवा पूर्ववत
By admin | Published: March 25, 2017 3:35 AM