पुणे : पाच दिवसांच्या सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर, शुक्रवारी रात्री ससूनमधील निवासी डॉक्टर कामावर रुजू झाले. त्यामुळे रुगणालयातील वैद्यकीय सेवा सुरळीत झाली; मात्र ससूनमध्ये रुग्णांची तुरळक गर्दी पाहायला मिळाली. दोन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारपासून गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.डॉक्टरांवरील हल्ल्यांसदर्भात शासनाकडून सुरक्षाव्यवस्थेचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री आठपासून निवासी डॉक्टर कामावर रुजू झाले. प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे आणि अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी शनिवारी सायंकाळी ६ वाजता रुग्णालयातील बहुतांश वॉर्डांना भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांनी निवासी डॉक्टर, तसेच रुग्णांशी संवाद साधून सूचना दिल्या. ससून रुग्णालयातील वैद्यकीय सेवा पूर्ववत झाली असली, तरी संपाची चर्चा बऱ्याच ठिकाणी रंगलेली पहायला मिळाली. डॉक्टरांवरील हल्ले, सुरक्षाव्यवस्था, डॉक्टरांचा संप, रुग्णांचे हाल याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले होते. पुन्हा अशा घटना घडू नयेत आणि रुग्णांची गैरसोय होऊ नये, असे मत अनेक रुग्णांनी या वेळी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. चार दिवस केवळ तातडीच्या सेवा सुरू असल्याने शनिवारी रुग्णालयातील विविध विभागांमध्ये काहीशी गर्दी झाली होती. सोमवारपासून पुन्हा गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.रुग्णांना भेटण्याची वेळ वाढवाडॉक्टरांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन ससून रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्था आणि सुरक्षारक्षकांची संख्या वाढवण्यात येत आहे. रुग्णांना भेटण्याची वेळ संध्याकाळी ५ ते ७ ठरवण्यात आली आहे. रुग्णाच्या नातेवाइकांसाठी प्रवेशपत्र यंत्रणेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकांवरील ताण वाढणार आहे. हा ताण कमी व्हावा आणि रुग्णांना भेटण्याची वेळ वाढवावी, यासाठी सुरक्षारक्षक सोमवारपासून आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. एखादा नातेवाईक रुग्णाला सकाळी १० वाजता भेटायला आला, तर त्याला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वाट पाहावी लागेल. अशा वेळी सुरक्षारक्षकांना धमकावणे, वॉर्डात जाऊ देण्यासाठी दबाव आणणे आणि हाणामारीच्या घटना घडणे, असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे सुरक्षारक्षकांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे, रुग्णांना भेटण्याची वेळ सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे एका सुरक्षारक्षकाने सांगितले. त्यामुळे ससून रुग्णालयात पुन्हा आंदोलन होऊन, रुग्णांना पुन्हा गैरसोयीला सामोरे जावे लागणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ससूनमधील वैद्यकीय सेवा सुरळीत
By admin | Published: March 26, 2017 2:24 AM