पुणे : राज्यातील सर्व निवासी वैद्यकीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ मधील त्यांच्या शाखेतील वैद्यकीय अभ्यासक्रमातील शिक्षण व सरावच मिळाला नाही. त्यामुळे या दोन शैक्षणिक वर्षासाठीचे विद्यापीठाकडून घेतले जाणारे शैक्षणिक शुल्क माफ करून विद्यार्थ्यांवरील आर्थिक व मानसिक ताण कमी करावा, अशी मागणी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील मार्डच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.
राज्यातील वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे सर्वच निवासी वैद्यकीय विद्यार्थी डॉक्टर मागील १४ महिन्यांपासून स्वतः च्या पदव्युत्तर विद्याशाखेचा सराव, तसेच अभ्यास सोडून कोरोना महामारीच्या आपत्तीविरूध्दच्या लढ्यात निस्सीम भावनेने देशहितासाठी अहोरात्र रुग्णसेवा करत आहेत. मात्र, प्रशासन या विद्यार्थ्यांच्या कोणत्याही मागण्या ऐकत नसल्याचेच समोर येत आहे.
कोरोनाविरुध्द लढ्यात विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे काणाडोळा करण्याची प्रशासनाची भूमिका खेदजनक आहे. कामाचा अतिरिक्त ताण सहन करत रुग्णसेवा करणाऱ्या निवासी विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. या कठीण काळात निवासी डॉक्टर्सना प्रोत्साहित करून त्यांच्या साठी पोषक वातावरण तयार करावे, अशी अपेक्षा मार्डने वैद्यकीय शिक्षण विभागकडे केली आहे.