पुणे : सर्व रुग्णांना माेफत औषधे देण्याचा माेठा गवगवा करत यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान ससून प्रशासनाने तब्बल तीन काेटी ६ लाख रुपये औषध खरेदीवर खर्च केले. परंतु, अजूनही रुग्णांना बाहेरूनच औषधे खरेदी करावी लागत आहेत. त्यामुळे या औषध खरेदीचे नेमके गाैडबंगाल काय आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ससून रुग्णालयामध्ये एप्रिलपासून रुग्णांना कोणतीही औषधे बाहेरून आणावी लागणार नाहीत, असे आश्वासन देण्यात आले हाेते. ससूनच्या मेडिकल स्टोअरमध्येच उपलब्ध व्हावीत, यासाठी औषध खरेदीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. त्यासाठी ‘झिराे प्रिस्क्रिप्शन’ राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्याच्या नावाखाली काेट्यवधींची खरेदी तर करण्यात आली मग गेली कुठे? असा प्रश्न आता रुग्ण विचारत आहेत.
गेल्यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत ५८ लाख ७९ हजार १७३ रुपयांची औषधे खरेदी करण्यात आली हाेती. मात्र, यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत ३ कोटी ६ लाख ४१ हजार ८४ रुपयांची औषधे खरेदी करण्यात आली आहेत. खरेदीची रक्कम पाचपट वाढलेली असताना साधी औषधेही का उपलब्ध होत नाहीत? हा प्रश्न गुलदस्त्यातच आहे.
ससूनच्या मेडिकल स्टोअरमध्ये बरेचदा औषधे उपलब्ध नसतात, त्यामुळे रुग्णांना औषधे बाहेरून आणण्यास सांगितले जाते. गरीब रुग्णांना ऐपत नसतानाही बाहेरून औषधे आणण्याशिवाय पर्याय नसतो. बाहेरून औषधे लिहून देण्यावर कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले हाेते. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थे आहे.
औषधे का उपलब्ध नाहीत, याबाबत माहिती घेऊन तातडीने कार्यवाही केली जाईल. रुग्णांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ दिली जाणार नाही. वेळेत साहित्य प्राप्त न झाल्यास स्थानिक खरेदी केली जाते.
- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून रुग्णालय