पुणे : शहरातील बड्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचा गैरफायदा घेऊन त्यांना आपल्याच रुग्णालयातील मेडिकलमधून औषधांची खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या रुग्णालयांना लवकरच चाप बसणार आहे. अशा प्रकारची सक्ती करण्याचे कोणतेही अधिकार या रुग्णालयांना नसल्याने शहरातील सर्व रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयातील मेडिकलमधून औषधखरेदी करण्याची सक्ती नसल्याचे फलक दर्शनीय भागात लावण्याचे आदेश महापालिकेच्या आरोग्य विभागाने दोन महिन्यांपूर्वी दिले होते. त्यानुसार, हे फलक लावण्यात आले आहेत किंवा नाही, याची तपासणी करण्यासाठी महापालिकेकडून पुढील आठवड्यापासून विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असून, अशा प्रकारचे फलक न लावणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी दिली. शहरात अनेक मोठी रुग्णालये आहेत. काही वर्षांपासून या रुग्णांच्या सुविधेसाठी या रुग्णालयांमध्ये रुग्णालय प्रशासनाकडून मेडिकल स्टोअर सुरू करण्यात आलेली आहेत. औषधांची तातडीची निकड लक्षात घेऊन ही स्टोअर सुरू करण्यात आली आहेत. मात्र, अनेक रुग्णालये त्याचा गैरफायदा घेत असल्याचे प्रकार वारंवार समोर येऊ लागले आहे. त्यात प्रामुख्याने बाहेरील औषधे खराब असून त्यामुळे रुग्णाला त्रास झाला, तर आमची जबाबदारी नाही, असे सांगून आपल्याच स्टोअरमधून औषधे खरेदी करण्याची सक्ती केली जाते. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक भीतीपोटी याच दुकानातून औषधखरेदी करतात, मात्र, प्रत्यक्षात या ठिकाणच्या औषधांच्या किमती बाजारातील औषधांपेक्षा किती तरी अधिक असतात. त्यामुळे रुग्णांची आर्थिक फसवणूक तर होतेच; शिवाय मनस्तापही सहन करावा लागतो. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारच्या अनेक तक्रारी महापालिका तसेच अन्न औषध प्रशासन विभागाकडे करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेऊन सह आयुक्त (औषधे) अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी महापालिकेला पत्र पाठवून खासगी रुग्णांना रुग्णालयातील मेडिकल स्टोअरमधूनच खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही, याबाबत सूचना देण्याचे पत्र दिले होते.
रुग्णालयांतून औषधांची सक्ती नाही
By admin | Published: January 07, 2016 1:46 AM