पुणे : आसन-प्राणायाम-शुद्धीकरण-ध्यान हा योगाचा समुच्चय आहे. योगाच्या अनेक अंगांचे आणि त्याच्या परिणामांवर संशोधन झाले आहे. अलीकडच्या काळात ताणतणाव वाढल्याने ध्यानाकडे लोक आकर्षित होत आहेत. मन:स्वास्थ्य टिकविण्यासाठी त्याची आवश्यकता वाढली आहे. सातत्यपूर्ण साधनेने बरेच काही साध्य होऊ शकते. विचारमग्नतेतून विचारशून्यतेकडे जाण्याचा प्रवास ध्यानाने साध्य होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ योगाचार्य डॉ. विश्वास मंडलिक यांनी केले.
योगतज्ज्ञ मनोज पटवर्धन लिखित ‘योग-एक आनंदयात्रा’ या पुस्तकाच्या ऑनलाइन प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. प्रसाद राजहंस, विवेकचे कार्यकारी संपादक रवींद्र गोळे, लेखक मनोज पटवर्धन उपस्थित होते.
तर, पटवर्धन म्हणाले, सूर्यनमस्कार घालायला लागल्यानंतर आसनांची आणि नंतर योगाची आवड निर्माण झाली. यातूनच ध्यानाकडे आकर्षित झालो. त्याच्या विविध पद्धती शिकलो. ध्यानाविषयी लोकांच्या मनात कुतूहल आहे. आजच्या धकाधकीच्या काळात याविषयी ओढ व उत्सुकता वाढली आहे. या पुस्तकात प्राणयात्मक ध्यान, मंत्राध्यान, संकल्प ध्यान, जपानी ध्यान आदी १५-२० ध्यान पद्धती देण्यात आल्या आहेत.
सूत्रसंचालन पुस्तक प्रकाशन विभागाच्या प्रमुख शीतल खोत यांनी केले.