पुणे: ध्यानाच्या माध्यमातून आपल्या मनाला तयार केल्यास आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. त्यासाठी ध्यान निश्चितच महत्वाचे आहे. ध्यानामुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या व्यक्ती सशक्त होते, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांनी केले.
गेल्या २५ वर्षांपासून समाजात अविरतपणे लोकहिताचे काम करणाऱ्या तेजज्ञान फाउंडेशन रौप्य महोत्सव सिंहगड रोड येथील मनन आश्रम येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या रौप्य महोत्सवी वर्षाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेता व चित्रपट निर्माता सोनू सूद यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी तेजज्ञान फाउंडेशनच्या कार्यकारी विश्वस्त तेजविद्या, प्रेरक वक्ता आणि लेखक भूपेंद्रसिंग राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. हजारो शिष्य आश्रमात आणि ऑनलाईन सहभागी झाले होते.
सोनू सूद म्हणाले, तेजज्ञान फाउंडेशनची चळवळ ही समाजहिताची आहे. यात प्रत्येकाने सहभागी व्हायला हवे. स्वतःची मूठ आपण उघडून बघितली पाहिजे, काय माहीत आपल्या हातावरील रेषेमध्ये कोणाचा तरी जीव वाचवण्याची रेष लिहिली असेल. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळ अशी येते, त्यावेळी ठरवावे लागते पुस्तकाचे पान पलटी करायचे की पुस्तक बंद करायचे. पण आपण सर्वांनी जीवनाच्या पुस्तकाचे पान पलटी केल्यास इतिहास घडतो.
तेजविद्या म्हणाल्या, बाहेरच्या जगतात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रथम अंतर्मनात शांतता निर्माण करणे आवश्यक आहे. त्यांनी तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक सरश्री यांचा परिचय आणि त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा गौरव केला. ध्यानाचे महत्व पटवून देताना त्या म्हणाल्या ध्यान हे सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे. म्हणून प्रत्येकाने रोज ध्यान करणे गरजेचे आहे.
राठोड म्हणाले, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी सकारात्मक विचार ( हॅपी थॉट्स ) करणे फार महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर ध्यान करण्याने प्रत्येकाच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडतात. माझे आयुष्य फक्त आणि फक्त सकारात्मक विचार आणि ध्यानामुळे घडले. प्रत्येकाच्या जीवनात गुरू असणे गरजेचे आहे. गुरुमुळे जीवनाला अर्थ आहे. गुरूविना जीवन व्यर्थ आहे.