मीरा सुरेश कलमाडी राजकारणाच्या उंबरठ्यावर; सार्वजनिक कार्यक्रमात प्रथमच राहणार उपस्थित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 05:27 PM2018-01-25T17:27:12+5:302018-01-25T17:29:25+5:30
शहर काँग्रेसचे एकेकाळी सर्वेसर्वा असलेल्या सुरेश कलमाडी यांच्या पत्नी मीरा कलमाडी काँग्रेसच्या माध्यमातून पुण्याच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
पुणे : शहर काँग्रेसचे एकेकाळी सर्वेसर्वा असलेल्या सुरेश कलमाडी यांच्या पत्नी मीरा कलमाडी काँग्रेसच्या माध्यमातून पुण्याच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. काँग्रेसने आयोजित केलेल्या रक्तदान महायज्ञाच्या सांगतेचा मुहूर्त त्यासाठी त्यांनी निवडला आहे.
इंदिरा गांधी व वसंतदादा पाटील यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य संजय बालगुडे यांनी पुणे शहरात १०० ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचा संकल्प केला होता. त्यांची सांगता २९ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता टिळक रस्त्यावरील नितू मांडके सभागृहात होत आहे. मीरा कलमाडी या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांमध्ये आहेत. शहरातील राजकीय पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात त्यांची ही संभाव्य उपस्थिती चर्चेचा विषय झाली आहे.
सुरेश कलमाडी गेल्या काही वर्षापासून राजकीय विजनवासातच आहेत. काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तरीही त्यांचे राजकीय महत्त्व अद्याप अबाधित आहे. त्यामुळेच मध्यंतरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांची पुण्यात घरी जाऊन भेट घेतली होती. त्याच भेटीत मीरा कलमाडी यांना पुढे आणण्याचा विषय झाला असल्याचे राजकीय वतुर्ळात बोलले जात आहे.
लोकसभेसाठी पुण्यात काँग्रेसकडे सध्यातरी बलाढ्य उमेदवार नाही. विश्वजीत कदम मागील लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून अद्याप बाहेर आलेले नाहीत व पुण्यात त्यांच्या उमेदवारीला पक्षातूनच तीव्र विरोध आहे. त्यामुळेच मीरा कलमाडी यांना उमेदवार म्हणून पुढे आणण्याची मोर्चेबांधणी आतापासूनच सुरू करण्यात आली आहे.
बालगुडे यांनी सांगितले, की आपण त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले व त्यांनी स्वीकारले. त्यांच्याशिवाय आमदार अनंत गाडगीळ, माजी आमदार मोहन जोशी, माजी शहराध्यक्ष अभय छाजेड हेही कार्यक्रमात निमंत्रित आहेत. हे सगळेही काँग्रेसकडून सन २०१९ची लोकसभा निवडणूक पुण्यातून लढवण्यास इच्छूक आहेत.