पुणे : शहराच्या पाण्याच्या प्रश्नावर मुंबईत सोमवारी (दि. २६) कालवा समितीची बैठक होत असून, त्यावर पुण्याला सध्या दिले जाते तेवढेच पाणी द्यायचे की त्यात कपात करून ते १ हजार १५० एमएलडी करायचे याचा निर्णय होणार आहे. महापौर मुक्ता टिळक या बैठकीसाठी जाणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही या बैठकीत हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे.
पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच पुण्यातील आमदार, जलसंपदाचे वरिष्ठ अधिकारी, बैठकीला उपस्थित असतील. पुणे शहराने दररोज १ हजार १५० दशलक्ष लिटर पाणी घ्यावे असा जलसंपदाने आग्रह धरला आहे. कालवा समितीच्या महिनाभरापूर्वी झालेल्या बैठकीतच तसा निर्णय झाला होता. त्याचा दाखला देत जलसंपदाने महापालिकेचा खडकवासला धरणातील पाणी उपसा करणारा पंपच बंद केला होता. २२ नोव्हेंबरला दुसऱ्या वेळी झालेल्या या कारवाईमुळे महापालिकेची भंबेरी उडाली. महापौर तसेच आयुक्त सौरभ राव यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांना याबाबत माहिती दिली. बापट यांनी जलसंपदामंत्री महाजन यांच्याबरोबर बोलले, त्यामुळे त्याच रात्री लगेचच पंप सुरू झाला.
त्याच वेळेस बापट यांनी २६ नोव्हेंबरला मुंबईत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत महापौर तसेच आयुक्त व अन्य पदाधिकाºयांची बैठक घेण्याचे जाहीर केले. त्यात पुण्याच्या पाण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. ती बैठक उद्या होत आहे. धरणातील पाण्याचे नियोजन करताना शेती तसेच ग्रामीण भागाचा विचार करूनच पुण्याला दररोज १ हजार १५० दशलक्ष लिटर पाणी देण्याचा निर्णय झाला असे जलसंपदाचे म्हणणे आहे. त्यामुळे ते महापालिकेने इतकेच पाणी घ्यावे याबाबत आग्रही आहेत. महापालिका मात्र सध्या आहे तितकेच म्हणजे १ हजार ३५० दशलक्ष लिटर पाणी मिळावे यासाठी आग्रह धरत आहे. तेवढे पाणी मिळाले तरच संपूर्ण पुणे शहराला कसेबसे पाणी पुरवता येईल, असे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे.जलसंपदाकडून बिलाची मागणीजलसंपदाने महापालिकेकडे ७५ कोटी रुपयांची पाणीबिलाची मागणी केली आहे. त्यातील ३० कोटी रुपये महापालिका सोमवारीच अदा करणार आहे. त्यामुळे जलसंपदा आणखी काही दिवस १ हजार ३५० दशलक्ष लिटर पाणी घेऊ देईल असे दिसते आहे. मात्र या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची गरज आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे.सोमवारच्या बैठकीत यासंबंधी निर्णय होणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. पाणी पुरवठ्यात कपात झाली तर पुणे शहराला सध्या आहे त्यापेक्षा कमी वेळ पाणीपुरवठा होईल. पाणीपुरवठा विभागाला त्याचे नव्याने वेळापत्रक तयार करावे लागणार आहे. त्यातून पुन्हा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
पाणीपुरवठा विभागातीलच काही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले, की ११५० दशलक्ष लिटर पाणी दररोज मिळाले तर कदाचीत पुढे ऐन उन्हाळ्यात दिवसाआड पाण्याची वेळही पुण्यावर येण्याची शक्यता आहे. धरणात पाणी असताना ते गरज नसताना शेतीसाठी सोडून जलसंपदा पुण्यावर अन्याय करत असल्याची शहरातील स्वयंसेवी संस्था, संघटनांची भावना झाली आहे.