लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : वीज कामगारांच्या प्रश्नासंदर्भात उद्या सोमवारी (दि. २४) तिन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांसमवेत मुंबईमध्ये एक बैठक होणार आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास संपूर्ण राज्यातील वीज कामगार उद्यापासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती तांत्रिक वीज कामगार संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब सायकर यांनी दिली.
वीज कामगार, अभियंते, आधिकारी व कंत्राटी कामगार यांना फ्रंटलाईन कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. फ्रंटलाईन कर्मचारी समजून वीज कामगार, अभियंते, आधिकारी, कंत्राटी कामगार, सर्व सहायक, वीजसेवक, व प्रशिक्षणार्थी यांना व त्यांच्या कुटुंबीयांना प्रथम करोना लसीकरण करुन घ्यावे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या वीज कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाप्रमाणे ५० लाख रुपये मदत मिळावी. तिन्ही कंपन्या करता जुन्या टीपीएची तत्काळ नियुक्ती करावी. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वीजबील वसुली करता सक्ती करू नये या वीज कामगारांच्या प्रमुख मागण्या आहेत.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटना, सबाॅर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना व महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस ( इंटक ) या सहा संघटनांचा कृती समितीमध्ये समावेश आहे. या कृती समितीने सोमवार पासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलन काळात रुग्णालये व इतर अत्यावश्यक सेवा यांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम करण्यात येणार आहे.
या आंदोलन काळात अत्यावश्यक सेवा बाधित होणार नाहीत याची काळजी घेण्यात येणार आहे. रुग्णालये, कोविड सेंटर यांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती बाळासाहेब सायकर यांनी दिली.