लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिका प्रशासनाकडून राज्यशासनाकडे सादर करण्यात येणाऱ्या कचरा आराखड्यावर शहरातील खासदार आणि आमदारांच्या सूचना घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी सोमवारी (दि. २९) सकाळी १० वाजता महापालिकेत बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. फुरसुंगी-उरुळी देवाची ग्रामस्थांनी मागील महिन्यात कचरा बंद आंदोलन केले. यामुळे २० ते २२ दिवस शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कचराकोंडी झाली होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांशी चर्चा केली. यावर महापालिकेने एका महिन्याच्या आत कचऱ्याचा बृहत् आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने पंधरा दिवसांत हा आराखडा तयार करून महापौर मुक्त टिळक यांना सादर केला आहे. दरम्यान, महापौर आणि गटनेत्यांनी केलेल्या सूचनेनुसार, पालिका प्रशासनाने कचरा व्यवस्थापन आराखड्यात बदल केला असून, हा आराखडा आमदार आणि खासदारांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर त्यांनी केलेल्या सूचनांचा अंतर्भाव करून हा सुधारित आराखडा राज्यशासनाकडे पाठविला जाणार आहे.
कचराप्रश्नावर आज महापालिकेत बैठक
By admin | Published: May 29, 2017 3:24 AM