अजित पवारांसोबत बैठक, तात्काळ निर्णयही झाला; रोहित पवारांनी मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 11:18 AM2024-02-24T11:18:56+5:302024-02-24T11:20:48+5:30
बैठकीत घेतलेल्या निर्णयाबद्दल रोहित पवार यांनी अजित पवारांचे आभार मानले आहेत.
Ajit Pawar Rohit Pawar ( Marathi News ) :राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर पवार कुटुंबातही उभी फूट पडली असून राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध शरद पवार असा राजकीय सामना पाहायला मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांत जोरदार आरोप-प्रत्यारोपही रंगत आहेत. अशातच आज अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र कालवा सल्लागार समितीची पाणीविषयक ही बैठक होती. या बैठकीविषयी रोहित पवार यांनी आपल्या एक्स हँडवरून माहिती दिली आहे.
बैठकीत घेतलेल्या निर्णयाबद्दल रोहित पवार यांनी अजित पवारांचे आभारही मानले आहेत. "सध्याची दुष्काळसदृष्य परिस्थिती पाहता कुकडी प्रकल्पातून १ मार्चपासून पाणी सोडण्याच्या पाठपुराव्याला यश आले असून उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कुकडी प्रकल्पातून १ मार्च रोजी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळं कर्जत तालुक्यातील ५४ गावांच्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे. या निर्णयाबाबत अजितदादा यांचे माझ्या मतदारसंघाच्यावतीने आभार," असं रोहित पवार म्हणाले.
"हे आवर्तन ४० दिवसांपेक्षा कमी असणार नाही… अन्यथा सर्व गावांना पाणी पोचणार नाही आणि लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण होईल, हेही या बैठकीत निदर्शनास आणून दिलं. तसंच घोड प्रकल्पातूनही १ मार्च रोजी पाणी सोडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. शिवाय भीमा नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी एप्रिलमध्ये भीमा नदीतून पाणी सोडण्यात येणार आहे. सीना धरणातही कुकडीचं पाणी सोडण्याचा मुद्दा यावेळी बैठकीत उपस्थित केला," अशी माहिती रोहित पवारांनी दिली आहे.
सुप्रिया सुळेंनी बैठकीत कोणती मागणी केली?
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यादेखील कालवा समितीच्या बैठकीला हजर होत्या. या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी विविध मागण्या केल्या आहेत. "बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच तालुक्यात यावर्षी दुष्काळाची स्थिती आहे. पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी चारा यांची नितांत गरज आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने शहरी भागांनाही पिण्याच्या पाण्याची टंचाईची झळ बसू लागली आहे. याखेरीज शेतीसाठीही अपुरे पाणी आहे. जनाई शिरसाई पाणी योजनेच्या पाण्याचे देखील योग्य नियोजन आवशयक असून त्या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळणे आवश्यक आहे. शासनाने दुष्काळ निवारण्याच्या कामाला प्राधान्य देऊन पुण्याचे योग्य नियोजन करावे व जनतेला आधार द्यावा. अद्याप तीव्र उन्हाळा सुरु व्हायचा आहे तोवरच अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. यामध्ये दुर्गम भागातील गावांचा समावेश आहे. या गावांचा प्राधान्याने विचार करुन त्यांना पाणी पोहोचविण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्या. बहुतांश गावांमध्ये पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. पशुधन जगविण्यासाठी चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्स यांची प्रकर्षाने गरज आहे. शासनाने तातडीने याबाबत योग्य ते नियोजन आणि उपाय करावे. शासनाने या स्थितीचा आढावा घेऊन याबाबतही योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला द्याव्यात," अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांकडे केली आहे.