पुणे : स्मार्ट सिटी प्रकल्पांचा आढावा, कामांचे प्रगतिपुस्तक, भविष्यातील योजना अशा एकाही विषयावर विशेष चर्चा न करता पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची बैठक सोमवारी गुंडाळण्यात आली. पालकमंत्री गिरीश बापट महापालिकेत येणार असल्यामुळे बैठक तहकूब करण्यात आली.कंपनीचे अध्यक्ष नितीन करीर बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, शिवसेनेचे संजय भोसले हे संचालक उपस्थित होते. सल्लागार कंपनी व प्रलंबित कामे यावर बैठकीत चर्चा होणार होती. तुपे यांनी मागील सभेत स्मार्ट सिटीच्या कामांचे प्रगतिपुस्तक मागितले होते. तसेच कंपनीचे सल्लागार म्हणून काम करणाºया मेकॅन्झी या कंपनीच्या कामाबाबत अहवालही द्यावा असे सुचवले होते. हे दोन्ही विषय चर्चेला आणलेच गेले नाहीत. कंपनीचे एकूण ५२ प्रकल्प आहेत. त्यातील फक्त तीन प्रकल्प कसेबसे सुरू आहेत. सल्लागार कंपनी असलेल्या मेकॅन्झीच्या कामाबाबत अनेक आक्षेप आहेत. अनेक कामे त्यांच्याकडून सुरूच झालेली नाहीत असे संचालकांचे म्हणणे आहे.या विषयांवर सोमवारच्या बैठकीत चर्चा अपेक्षित होती. मात्र पालकमंत्री बापट महापालिका कार्यालयात काही कार्यक्रमांसाठी येणार होते. त्यामुळे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते यांनी बैठकीत कोणत्याही विषयाची चर्चा होऊ दिली नाही.
स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनची बैठक गुंडाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 7:25 AM