पुणे - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर असून त्यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांचा महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन स्वागत सन्मान करण्यात आला. गणेशोत्सव काळात मुख्यमंत्र्यांनी अगदी पहाटे ४ वाजेपर्यंत कार्यकर्त्यांच्या घरोघरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले आहे. तर, अनेक दिग्गजांच्याही घरी भेटी दिल्या आहेत. त्यातच, आज पुणे दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री अभिनेता नाना पाटेकर यांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले.
एकनाथ शिंदे यांनी नाना पाटेकर यांच्या पुणे जिल्ह्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील घराला भेट दिली. यावेळी पाटेकर यांच्या घरी स्थापना करण्यात आलेल्या श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि खासदार श्रीरंग बारणे आणि पाटेकर कुटूंबातील सर्व प्रमुख सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला नाना बाहेरच उभे होते. त्यामुळे गाडीतून उतरताच नाना आणि शिंदे यांची गळाभेट झाली. यावेळी, नानांची गळाभेट होताच, निसर्गाच्या सानिध्यात... अशा शब्द मुख्यमंत्र्यांनी उच्चारला. त्यावेळी, सर्वचजण हसले. दरम्यान, नाना पाटेकर यांचाही मुख्यमंत्र्यांच्यावतीने सन्मान करण्यात आला.
पुण्यात शिंदे म्हणाले
एकनाथ शिंदे म्हणाले, यावर्षीचा गणपती जोरदार आहे ना ! निर्बंधमुक्त गणपती उत्सव ! मोकळ्या मनाने मोकळा श्वास घेत संपूर्ण महाराष्ट्रात गणेशभक्त मोठया उत्साहात, जल्लोषात, धुमधडाक्यात हा उत्सव साजरा करीत आहेत. हे बघून फार आनंद होत असून समाधान वाटत आहे. तुम्हाच्या आयुष्यात चांगले दिवस येवो, सुख-समृद्धीचे , भरभराटीचे दिवस येवोत. या राज्यावरचे सर्व अरिष्ट, संकट, इडा-पिडा टळू देत, हीच गणरायाचरणी प्रार्थना केल्याचे त्यांनी गणेशभक्तांशी बोलताना सांगितले.