पुणे : शिक्षक हा समाज घडवत असतो. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची, बंधुतेची भावना जोपासण्याचे काम लोकशिक्षक करत असतात. आधुनिक शिक्षण देण्याबरोबरच माणुसकीचे, नैतिक मूल्यांचे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. साहित्यातून, संमेलनातून ते सहज होते. 'माणूस'पणाची जाणीव करून देणारी ही संमेलने खऱ्या अर्थाने ऊर्जेची केंद्रे आहेत, असे प्रतिपादन विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. माधवी खरात यांनी केले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि रयत शिक्षण संस्थेच्या औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित आठव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हरिश्चंद्र गडसिंग यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
याप्रसंगी स्वागताध्यक्ष माजी आमदार अॅड. राम कांडगे, बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे, संमेलनाचे निमंत्रक प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, रयत शिक्षण संस्थेचे किसन रत्नपारखी, महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ. संजय नगरकर, बंधुता साहित्य परिषदेचे सरचिटणीस शंकर आथरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी सूर्यकांत सरवदे, रवींद्र जाधव आणि चंद्रकांत सोनवणे या विद्यार्थ्यांना साने गुरुजी गुणवंत विद्यार्थी पुरस्काराने गौरविण्यात आले. दुपारच्या सत्रात प्रसिद्ध कवी चंद्रकांत वानखेडे यांचा 'जाऊ कवितेच्या गावा' हा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर झाला.
शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. संजय नगरकर यांनी आभार मानले.