पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बुधवारी (9 डिसेंबर) झालेल्या संचालकांच्या बैठकीत बहुमताने विश्वासदर्शक ठराव जिंकल्याने पुन्हा एकदा मेघराज राजेभोसले यांच्याअध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाले. माझ्या हातून काही चुका झाल्या असतील तर माफ करा, अशा शब्दातं राजेभोसले यांनी मोठ्या मनाने दिलगिरी व्यक्त केल्याने त्यांच्यावरील अविश्वासाचा ठराव नामंजूर करण्यात आला.
मनमानी कारभार आणि गैरकृत्य केलेल्यांना पाठिशी घातल्याचा ठपका ठेवत चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्याविरोधातील अविश्वासाचा ठराव 26 नोव्हेंबर रोजी आठ विरूद्ध चार मतांनी मंजूर करण्यात आला होता. प्रभारी अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्याकडे कार्यभार सोपविण्यात आला होता. लवकरच नवे पदाधिकारी निवडले जातील असे सुतोवाच करण्यात आले होते. दरम्यान, निवडणूक आली म्हणून माझ्या पाठीत खंजीर खुपसला गेला. मी राजीनामा दिलेला नाही आणि खचलेलो नाही. याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा मेघराज राजेभोसले यांनी दिला होता.बुधवारी (9 डिसेंबर) मुंबई येथे चित्रपट महामंडळाच्या संचालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये नव्या अध्यक्षपदाची निवड होणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यामुळे अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याकडे चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले होते. या बैठकीला 13 संचालक उपस्थित होते. मेघराज राजेभोसले यांनी बैठकीत अचानक मवाळ भूमिका घेतली. अविश्वास ठरावाच्या मुद्यांसंदर्भात माझे काही चुकले असेल, माझ्याकडून कुणी दुखावले गेले असेल तर मी माफी मागतो, अशी दिलगिरी त्यांनी व्यक्त केल्याने सहा विरूद्ध सात मतांनी त्यांचा अविश्वासाचा ठराव मागे घेण्यात आला.----------------------------------------------------------------------------------------बैठकीत मेघराज राजेभोसले यांचा अविश्वास ठराव नामंजूर करण्यात आला.बैठकीत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे नव्या अध्यक्षांचा विषय बैठकीत आला नाही. आता तेच पुन्हा महामंडळाचे अध्यक्ष राहातील- सुशांत शेलार, कार्यवाह, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ----------------------------------------------------------------------------------------------------------