पुणे : महापालिकेच्या मुख्यसभेमध्ये मंगळवार, दि. २१ मार्च रोजी स्थायी समितीसह शहर सुधारणा समिती, महिला बालकल्याण समिती, क्रीडा समिती व नाव समितीच्या सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. पालिकेचा ५ हजार कोटी रुपयांचा डोलारा सांभाळणाऱ्या स्थायी समितीमध्ये आपली वर्णी लागावी यासाठी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेच्या सदस्यांकडून जोरदार फिल्डिंग लावण्यात येत आहे.महापालिकेच्या सभागृहामध्ये राजकीय पक्षांच्या नगरसेवकांच्या संख्येनुसार त्यांना समितीच्या सदस्यपदांचा कोटा ठरवून देण्यात येतो. भाजपाने यंदाच्या निवडणुकीत ९८ जागा पटकावित मोठी मजल मारली आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसकडे ४३, काँग्रेसकडे १०, शिवसेनेकडे १० व मनसे २, एमआयएम १ असे बलाबल आहे. त्यानुसार त्यांना समित्यांमध्ये स्थान मिळणार आहे.स्थायी समितीवर एकूण १६ सदस्यांची निवड केली जाते. भाजपाच्या संख्येनुसार त्यांच्या १० नगरसेवकांची स्थायी समितीमध्ये वर्णी लागणार आहे. राष्ट्रवादीच्या ४, तर शिवसेना व काँग्रेसच्या प्रत्येकी १ सदस्याला स्थायी समितीवर काम करता येईल. उर्वरित शहर सुधारणा, महिला बालकल्याण, क्रीडा व ....नाव...? समितीवर एकूण १३ सदस्यांची निवड केली जाते. त्यापैकी भाजपाच्या प्रत्येकी ८ सदस्यांची प्रत्येक समितीवर वर्णी लागेल. महापालिकेतील सत्ताधारी भाजपाकडून महापौरपद ब्राह्मण समाजाकडे, उपमहापौरपद दलित समाजाकडे, सभागृह नेतेपद इतर मागास प्रवर्गातील व्यक्तीकडे देण्यात आले आहे. त्यामुळे स्थायी समितीचे अध्यक्षपद बहुजन समाजातील व्यक्तीला देण्यात येणार आहे. स्थायी समितीवर सदस्य म्हणून आपली वर्णी लागावी यासाठी भाजपाच्या नगरसेवकांकडून जोरदार फिल्डिंग लावण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
समितीच्या सदस्यांची मंगळवारी निवड
By admin | Published: March 17, 2017 2:29 AM