१८/०२/२०२१ रोजी झालेल्या भोर पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने दिलेल्या उमेदवाराला मतदान करावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनेत्याच्या व्हिपचे पालन न करता विरोधात मतदान केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी १७/३/२०२१ रोजी राष्ट्रवादीचे पंचायत समितीचे सदस्य दमयंती जाधव, श्रीधर किंद्रे, श्रीमती मंगल बोडके यांच्या विरोधात पक्षाचा व्हिप डावलल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल करून सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांना लेखी म्हणणे मांडण्यासाठी व कागदोपत्री पुरावे सादर करण्यासाठी नोटीस काढून तारीख नेमून पुरेसा वेळ दिला होता. मात्र, सदस्य लेखी पुरावा किंवा कागदपत्रे सादर करू शकले नाहीत, त्यामुळे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी १४/९/२०२१ रोजी भोर पंचायत समितीच्या सभापती दमयंती पर्वती जाधव, श्रीधर रघुनाथ किंद्रे व मंगल सोपान बोडके यांचे भोर पंचायत समितीचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश दिला आहे.
कोणत्याही निवडणुकीत पक्षाच्या व्हिपचे पालन न करता विरोधात गेल्याने पद गमवावे लागते, हा धडा यातून सदस्यांना शिकायला मिळाला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मागील १५ वर्षांत तीन सभापती पदाच्या निवडणुकीत पक्षादेश डावलून पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात मतदान केले होते. मात्र, पक्षाने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नव्हती. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी व्हिप डावलणाऱ्या सदस्यांच्या विरोधात याचिका दाखल करून त्यांचे सदस्यत्व रद्द करून वेगळा संदेश दिला आहे. यामुळे बंडखोरांना चपराक बसणार आहे.
सभापतीचे सदस्यत्व रद्द, उपसभापती पाहणार कारभार
भोर पंचायत समितीच्या सभापती दमयंती जाधव यांचे पंचायत समिती सदस्यत्व रद्द झाल्याने त्यांचे सभापतीपदही रद्द झाले आहे. यामुळे नियमानुसार भोर पंचायत समितीचे उपसभापती लहू शेलार भोर पंचायत समितीच्या सभापतीपदाचा कारभार पाहणार आहेत. यामुळे गतवेळी बंडखोरीमुळे हुलकावणी दिलेले सभापतीपद लहूनाना शेलार यांना पक्षाशी प्रामाणिक राहिल्याने पुन्हा मिळाले आहे.
सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी दिली होती. मात्र, आमच्या सदस्यांनी बंडखोरी केल्याने सभापतीपद मला मिळाले नव्हते. मात्र, जिल्हाध्यक्ष व पक्षाने पाठपुरावा करून व्हिप डावलणाऱ्यांचे सदस्यत्व रद्द करून घेतल्याने मला न्याय मिळाला आहे.
लहूनाना शेलार
उपसभापती, भोर पंचायत समिती