पुणे : नामदेव समाजोन्नती परिषदेच्या पुढाकाराने व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने पंढरपूर येथे चंद्रभागेच्या तीरावर ६० कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक तंत्राचा वापर करून विश्वसंत नामदेव महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाकडे आराखडा सादर करण्यात येणार असल्याचे नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष अॅड. सुधीर पिसे यांनी सांगितले.या नियोजित स्मारकाचा आराखड्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असाव्यात, यावर चर्चा करण्यासाठी परिषदेने अभ्यासक, तज्ज्ञ आणि मार्गदर्शकांची बैठक नुकतीच पुण्यात झाली. याबद्दल अॅड. पिसे यांनी माहिती दिली.ते म्हणाले, ‘‘एकूण खर्चापैकी १५ कोटी शासनाने यापूर्वीच मंजूर केले आहेत. उर्वरित रक्कम केंद्र तसेच महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान सरकारसह वारकरी, फडकरी तसेच सर्व जाती-धर्मातील बांधवांच्या सहकार्याने उभारण्यात येईल.’’ बैठकीला तु. पां. मिरजकर, डॉ. निशिकांत मिरजकर, डॉ. ज्ञानेश्वर तांदळे, प्राचार्य नि. ना. रेळेकर, वीणा मनचंदा, ह. भ. प. मंगला कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.तसेच ह. भ. प. वासुदेव उत्पात, ह. भ. प. प्रकाश निकते, ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर व प्रा. श्यामसुंदर मिरजकर यांचे विचार लिखित स्वरूपात सभेपुढे मांडण्यात आले.
संत नामदेव महाराजांचे स्मारक पंढरपूरला होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 4:58 AM